- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने धानासह अन्य खरीप पिकांच्या स्थितीबाबत शेतकऱ्यांची चिंता वाढली होती.अशा परिस्थितीत काल रविवारी झालेला पाऊस पिकांसाठी महत्त्वपूर्ण मानला जात आहे.शेतांमध्ये ओलावा वाढल्याने धान पिकाच्या वाढीस त्याचा फायदा होण्याची शक्यता आहे.सध्या खरीप पिकांच्या वाढीसाठी पुरेशा पावसाची आवश्यकता आहे.त्यामुळे ग्रामीण भागात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी आगामी काळातही पावसाची हजेरी राहण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.अश्यातच गोंदिया जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडण्यात आल्याने भंडारा जिल्ह्यातील नदीच्या पाणीपातळीवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.गोंदिया जिल्ह्यात कालीसरार व पुजारीटोला या दोन्ही धरणांतून सोडण्यात आलेले पाणी वैनगंगा नदीच्या प्रवाहातून पुढे भंडारा जिल्ह्याच्या दिशेने येत आहे. त्यामुळे आगामी काळात वैनगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.विशेष म्हणजे,गोंदिया जिल्ह्यातील पुजारीटोला धरणाचे चारही दरवाजेही उघडण्यात आले असून त्यातून ३ हजार ४९ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.तर वाढत्या पाण्याच्या प्रवाहामुळे वैनगंगा नदीवरील धापेवाडा धरणाचे १३ दरवाजे उघडण्यात आले.सध्या त्यातून ९७ हजार ३१३ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.वैनगंगा नदीच्या पाणलोट क्षेत्रासह मध्य प्रदेशातील लगतच्या भागांतही जोरदार पाऊस झाल्याने नदीच्या प्रवाहात मोठी वाढ झाली आहे.परिणामी,वैनगंगा नदीची पाणीपातळी सातत्याने वाढत असून,धापेवाडा धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून वैनगंगा नदीकिनारी राहणाऱ्या गावांतील रहिवाशांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला असून नागरिकांना नदीपात्रात किंवा नदीकिनारी असलेल्या धोकादायक भागांजवळ जाणे टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
- Advertisement -

