उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :- कित्तेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या अजूनही कायम आहे.कुठे पाइपलाइन फुटलेली तर कुठे नळ योजना कुचकामी ठरलेली दिसून येते.लाखो,करोडो रुपये खर्चूनही पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या भेडसावत असेल तर यांस जबाबदार कोण? असा प्रश्न पडतो आहे.अशातच करोडो रुपये खर्चूनही गावातील लोकांना गढूळ व दुषित पाणी प्यावे लागत असल्याचा प्रकार चंद्रपूर जिल्ह्याच्या पोंभूर्णा तालुक्यात उघडकीस आला आहे.
पोंभूर्णा तालुक्यातील १५ गावांना पाणीपुरवठा करणारी वेळवा ग्रीड पाणीपुरवठा योजना बंद असल्याने नागरिकांना गढुळ पाणी प्यावे लागत आहे; असा आरोप करून शिवसेना (ठाकरे) कार्यकर्त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांच्या अंगावर गढुळ पाणी फेकले.पोंभुर्णा पोलिसांनी काल,गुरुवारी दुपारी ६० जणांवर गुन्हे दाखल केले आहे.या घटनेने आंदोलनाला गालबोट लागले असून पंचायत समिती प्रशासनातही खळबळ उडाली आहे.
१५ गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी सुमारे ३० कोटी रूपये खर्च करून वेळवा येथे ग्रीड पाणीपुरवठा योजना उभारली.मात्र,मागील दीड महिन्यापासून वीज बिल न भरल्याने योजना बंद पडली आहे.तेव्हापासून १५ गावांना गढूळ व दुषित पाणी प्यावे लागत आहे. याबाबत ग्रामस्थांनी पंचायत समिती,ग्रामीण पाणीपुरवठा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे अनेकदा निवेदने दिली.मात्र,प्रश्न सुटला नाही.शिवसेनाचे ठाकरे जिल्हाप्रमुख संदीप गिन्हे यांच्या नेतृत्वात पंचायत समितीसमोर घागरफोड आंदोलन झाले.या आंदोलनादरम्यान काहींनी गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनासमोर घागर फोडण्याचा प्रयत्न केला.त्यानंतर शिवसेना पदाधिकारी गटविकास अधिकारी विवेक बेल्लालवार,ग्रामीण पाणी पुरवठाचे उपअभियंता विलास भंडारी यांच्याशी चर्चा करीत होते.दरम्यान काहींनी गटविकास अधिकारी बेल्लालवार यांच्या अंगावर गढुळ पाणी फेकले.त्यामुळे दालनात खळबळ उडाली.बीडीओ बेल्लालवार यांनी या घटनेची तक्रार पोलिसात केली.
तक्रारीवरून शिवसेना ठाकरे जिल्हाप्रमुख संदीप गिन्हे,आशिष कावटवार,वैभव पिंपळशेंडे यांच्यासह ६० जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

