उद्रेक न्युज वृत्त :- शासनाकडून निराधार व्यक्तींना विविध योजनांच्या माध्यमातून महिन्याकाठी ठराविक मानधन अदा केले जाते.हे मानधन लाभार्थ्यांना तहसील स्तरावरून बँकेत पाठवून संबंधितांच्या खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया केली जाते.आता मात्र,थेट डीबीटीमार्फत म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर(थेट लाभ हस्तांतरण) निराधार अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग केले जाणार आहे.
संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेच्या लाभासाठी यापूर्वी तहसीलकडून संबंधित बँकेत सर्व लाभार्थीची यादी पाठवून त्यानुसार निधी दिला जात होता.तो निधी बँकेकडून संबंधित लाभार्थीच्या खात्यात वर्ग केला जात होता.या प्रक्रियेस विलंब होत होता.त्यामुळे वयोवृद्ध लाभार्थीना अनुदानासाठी बँकांत खेटे घालावे लागत होते.मात्र आता निराधारांचे अनुदान थेट डीबीटीमार्फत मिळणार असल्याने निराधारांची हेळसांड थांबून बँक कर्मचाऱ्यांची कसरत थांबणार आहे.त्यासाठी या दोन्ही योजनांचा लाभ घेत असलेल्या पात्र निराधारांकडून आधारकार्ड आणि मोबाइल क्रमांक संकलित करण्याची प्रक्रिया गोंदिया विभागाकडून सुरू करण्यात आली आहे.याबाबत गावस्तरावर तलाठ्यांना आवश्यक त्या सूचना देऊन संबंधितांना कळविले जात आहे.
संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजनेचा लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांनी येत्या ३० मे पर्यंत आधारकार्ड व मोबाइल क्रमांक तलाठी यांच्याकडे देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.या मुदतीत आधारकार्ड व मोबाइल क्रमांक न देणाऱ्या लाभार्थ्यांना अनुदानापासून वंचित राहू शकते.
निराधार व्यक्तींना विविध योजनांच्या माध्यमातून महिन्याकाठी ठराविक मानधन दिले जाते. ते आता डीबीटीमार्फत सरळ लाभार्थ्यांच्या खात्यात दिले जाणार आहे.यासाठी हयात असलेले प्रमाणपत्र, आधारकार्ड,बँकेचे पासबुक आणि मोबाइल नंबर, आधार ज्या बँकेला लिंक असेल त्याच बँकेत पैसे जाणार आहेत.

