उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- आतापर्यंत आपण शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अतिरिक्त होतात; हे पाहिले आहे. पण आता शाळेतील मुख्याध्यापक सुद्धा अतिरिक्त झाल्यास आश्चर्य वाटून घेऊ नका.संच मान्यतेच्या नवीन निकषात तशी तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे पैसे वाचवण्यासाठी शासनाने शिक्षण क्षेत्राला वेठीस धरू नये; अशी अपेक्षाही मुख्याध्यापक व शिक्षण तज्ज्ञ करीत आहेत.
१५ मार्च २०२४ रोजी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने संच मान्यतेचा सुधारित निकष या गोंडस नावाचा एक शासन निर्णय निर्गमित केला आहे.त्याच शासन आदेशात मुख्याध्यापकाचे पद अनुज्ञेय होण्यासाठी सुद्धा कलम ४ आणि ४.१ मध्ये काही निकष दिलेले आहेत.त्यानुसार येत्या शैक्षणिक वर्षापासून म्हणजेच जून २०२४-२५ पासून या शासन निर्णयानुसार पद निश्चिती होईल.त्यातील तरतुदीनुसार आता माध्यमिक शाळेतील सर्व वर्गाची विद्यार्थी संख्या जर १५० पेक्षा कमी झाली तर त्या शाळेतील मुख्याध्यापक अतिरिक्त ठरेल.एका अर्थाने त्या शाळेत मुख्याध्यापक असणार नाही.इंजिनविना ही शैक्षणिक गाडी धावणार आहे.विशेष म्हणजे या शासन निर्णयात यापूर्वीचे या विषयाशी संबंधित म्हणजेच शाळातील मुख्याध्यापक,पर्यवेक्षक,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पद मान्यता ठरविणारे म्हणजे २८ ऑगस्ट २०१५, ८ जानेवारी २०१६, २ जुलै २०१६ व १ जानेवारी २०१८ हे चारही शासन निर्णय या नव्या आदेशानुसार अधिक्रमित केले आहेत.अतिरिक्त ठरविण्यासाठी आता सन २०२४-२५ पासून हाच, म्हणजे १५ मार्च २०२४ चा शासन निर्णय ग्राह्य धरला जाणार आहे.

