उद्रेक न्युज वृत्त
वरोरा(चंद्रपूर) :- एका वसाहतीमध्ये किरायाने राहणारे न्यायाधीश बाहेरगावी गेले असता घरात कुणी नसल्याचा फायदा चोरट्यांनी घेत न्यायाधीशांचे घर फोडले.घरातून सोने,चांदी व रोख असा हजारो रुपयांचा ऐवज चोरून नेला.ही घटना २४ मे रोजी उघडकीस आल्याने वरोरा शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे.
सीनियर डिव्हिजनचे दिवाणी न्यायाधीश तथा न्यायदंडाधिकारी डी.आर.पठाण हे देशपांडे पेट्रोल पंपाच्या मागील ओम शांती नगरातील चंद्रकांत पुसदकर यांच्या घरी मागील काही महिन्यापासून किरायाने राहत आहेत.काही दिवसांपूर्वीच ते बाहेरगावी गेले होते.२३ मे च्या रात्री चोरट्यांनी घरात कोणी नसल्याचे बघत घराच्या समोरील दाराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला व घरातील १२ ग्रॅम सोन्याची चेन,दहा हजार रोख,सौदी अरेबियाचे पाचशे व दोनशे रुपयांचे डॉलर चोरून नेले; अशी माहिती वरोरा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अमोल काचोरे यांनी दिली.२४ मे रोजी सकाळी घरमालक पहिल्या मजल्यावर गेले असता चोरी झाल्याचे दिसून आले. याबाबत वरोरा पोलिसात तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर वरोरा पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली.
ठसेतज्ज्ञ तसेच श्वान पथकास पाचारण केले.श्वान पथक चोरी झालेल्या ठिकाणाहून १०० ते १५० मीटरपर्यंत गेल्यानंतर परत आले.घटनास्थळावर जिल्हा गुन्हे शोध पथक दाखल झाले.घटनेचा तपास वरोरा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

