उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- चालत्या दुचाकीवर वृक्ष कोसळल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना एटापल्ली तालुक्यातील उडेरा-बुर्गी मार्गावर शुक्रवारी दि. १४ जून रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली.नेवलू मासू गावडे वय ४० वर्षे रा.पुरसलगोंदी ता. एटापल्ली असे मृतकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार,नवलू गावडे व पत्नी पोवरी हे दोघेही पती-पत्नी शुक्रवारी दि.१४ जून ला सायंकाळी पुरसलगोंदी गावावरून एका लग्न समारंभासाठी करपनफुंडी येथे एमएच ३३ ए ६२८२ क्रमांकाच्या दुचाकीने जात होते.दरम्यान,उडेरा ते बुर्गी गावाच्या मध्ये पोहोचल्यानंतर अचानक वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली.
वाटेत पत्नी पोवरी लघुशंकेसाठी दुचाकीवरून खाली उतरली.नेवलू हा थोडा पुढे जाऊन थांबण्याच्या बेतात असतानाच,जोरदार वादळाने रस्त्याच्या कडेचा वृक्ष नेवलूच्या दुचाकीवर कोसळला.अवाढव्य वृक्ष अंगावर कोसळून नेवलूचा जागीच मृत्यू झाला. घटनेच्या माहितीवरुन, पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय एटापल्ली येथे पाठविला. नेवलूच्या मृत्यूने गावात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. शासनाने परिवाराला आर्थिक मदत करावी, अशी मागणी नातेवाईक व नागरिकांनी केली आहे.

