उद्रेक न्युज वृत्त
गोंदिया :- अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील इटखेडा जवळील संभाजीनगर येथे काल,शनिवारी दि.१५ जून रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास वाघाने दोन गाई ठार केल्या,तर एका बैलाला गंभीर जखमी केले.सदर घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील इटखेडा संभाजीनगर हा जंगलव्याप्त परिसर आहे.याठिकाणीजंगली हिंस्र पशू व वाघांसह बिबट्यांचा नेहमीच वावर असतो. परिसरात नेहमीच वाघ व बिबट्यांचे अनेकदा नागरिकांना दर्शन झाले आहे.आजपर्यंत अनेक पाळीव जनावरांची हिंस्र प्राण्यांनी शिकार केल्याची माहिती आहे.
अशीच घटना काल,शनिवारी दुपारी ४ वाजेच्या दरम्यान संभाजीनगर/इटखेडा येथे घडली.यामध्ये वाघाने शंकर भागडकर यांच्या दोन गाई ठार केल्या, तर एक बैल गंभीर जखमी झाला आहे.घटनेची माहिती मिळताच पशुवैद्यकीय अधिकारी रवींद्र फदे तथा वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले व घटनेचा पंचनामा केला.नुकसानग्रस्त शंकर भागडकर यांना त्वरित नुकसानभरपाई देण्यात यावी व वारंवार होणाऱ्या घटनांचा व हिंस्र प्राण्यांचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी इटखेडा येथील ग्रामस्थांनी केली आहे.

