- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमानंतर पोलिस ठाण्याच्या आवारात चित्रपट गीतावर नाचणे चार पोलिस कर्मचाऱ्यांना चांगलेच भोवले आहे.या प्रकरणात त्यांना निलंबित करण्यात आले आहे.हे चारही कर्मचारी तहसील पोलिस ठाण्यातील आहेत.
१५ ऑगस्ट रोजी तहसील पोलिस ठाण्यात स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमानंतर देशभक्तीपर गीते लाउडस्पीकरवर वाजविण्यात आली.त्यावर कर्मचाऱ्यांनी ठेका धरला होता.मात्र,त्यानंतर एका कॉन्स्टेबलला ‘छोरा गंगा किनारे वाला’ हे गाणे गायची हुक्की आली.त्याने गाणे गायला सुरुवात केली व आग्रहापोटी एक सहायक पोलीस उपनिरीक्षक तसेच दोन महिला कर्मचाऱ्यांनी फेर धरीत नृत्य केले.त्याचा ठाण्यातील एका कर्मचाऱ्याने व्हिडीओ काढला.तो काही वेळातच व्हायरल झाला.पोलिसही माणूस आहेत; त्यांनाही स्वातंत्र्यदिन साजरा करण्याचा अधिकार आहे; असे म्हणून अनेकांनी तहसील पोलिस ठाण्यात झालेल्या या आगळ्यावेगळ्या स्वातंत्र्यदिनाच्या जल्लोषाचे नेटिझन्सने स्वागत केले.
मात्र,काही काळाअगोदर वरिष्ठ पातळीवरून यासंदर्भात निर्देश जारी करण्यात आले होते व गणवेशात नाचण्यावर निर्बंध घालण्यात आले होते. याचे उल्लंघन केल्याची बाब वरिष्ठांकडून गंभीरतेने घेण्यात आली.मुख्यालयातून त्यांचे निलंबन करण्याचे आदेश देण्यात आले.चौघांनाही निलंबित करण्यात आले आहे.
कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर👇
दरम्यान,या कारवाईनंतर पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.चौघेही जण स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात पुढाकार घेत सहभागी झाले होते.त्यांनी दोन देशभक्तिपर गीतेदेखील म्हटली होती.
कार्यक्रम झाल्यावर थोडा ताणतणाव हलका करण्यासाठी गाणे गात नृत्य केले.मात्र त्यासंदर्भात निलंबनाची कारवाई करणे हा अन्यायच असल्याची अनेक कर्मचाऱ्यांची भावना आहे.
- Advertisement -

