उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली) :-येत्या काही दिवसात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे.नेमकी हीच नामी संधी साधून समाजकारण अथवा राजकारणात कधीही सक्रिय नसणारे अनेक चेहरे अचानक सक्रिय झाल्याचे दिसून येत आहेत. विधानसभेसाठी पक्षाकडून कुणाला उमेदवारी मिळेल,हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी अनेकांना मात्र,आतापासूनच आमदार होण्याचे स्वप्न पडू लागल्याचे चित्र दिसून येत आहे.
आरमोरी विधानसभा क्षेत्र अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे.त्यामुळे या मतदारसंघातून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या इच्छुकांची संख्या वाढत आहे.लोकसभेची निवडणूक संपताच काही इच्छुकांनी सक्रिय होत बोलबाला करण्याचा प्रयत्न केला आहे.
काही राजकीय पक्षांच्या सक्रिय नेत्यांनी विधानसभा क्षेत्रात मतदारांच्या प्रत्येक गृहभेटी घेण्यास प्रारंभ केल्याचे चित्र आरमोरी विधानसभा क्षेत्रात दिसून येत आहे.मात्र,विधानसभेची जागा कोणाच्या वाट्याला जाते हे अद्याप निश्चित झाले नसले तरी,भाजपा, काँग्रेस व इतर पक्षातील कार्यकर्त्यांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे.काँग्रेसमध्ये अनेकांची दावेदारी पुढे येत आहे.काँग्रेसची उमेदवारी मिळावी म्हणून आमदारकीचे डोहाळे लागलेले काही जण पंजा हातात घेण्याची तयारी करीत आहेत.
उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या नेत्यांनी आपल्या समर्थकांना आतापासूनच मेजवानी देण्याचा प्रकार सध्या आरमोरी विधानसभा मतदारसंघात सुरू केल्याचे चित्र आहे.कार्यकर्त्यांना एकप्रकारे सुगीचे दिवस आले आहे.काही नेत्यांनी दबावतंत्र वाढविण्यासाठी मेजवानी सुरू केल्याचे बोलले जाते.
सोशल मीडियाच्या माध्यमातून दैनंदिन दौऱ्यांची माहिती, गावकऱ्यांसोबत चर्चा केल्याचे व्हिडीओ टाकले जात आहे. विधानसभेच्या उमेदवारीसाठी काही निवडक खमक्या नेत्यांनी आतापासूनच हायफाय यंत्रणा कामास लावल्याचे दिसून येत आहे.मतदार अशा खमक्या नेत्यांची बेडूक उडी कशासाठी आहे; हे सर्व ओळखून आहेत.काही अति महत्त्वाकांक्षी नेत्यांनी स्वतःच आपली दावेदारी रेटून पुढे केल्याचा प्रकार दिसून येतो आहे.

