उद्रेक न्युज वृत्त
लाखांदूर(भंडारा) :-महाराष्ट्र राज्य वैद्यकीय परिषदेअंतर्गत नोंदणीकृत नसताना अनधिकृतपणे रुग्णांवर उपचार करणाऱ्या कथित बोगस डॉक्टरवर तालुका आरोग्य समितीच्या तक्रारीवरून लाखांदूर पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून बोगस डॉक्टरला अटक केली.अरिदम शिबू बिश्वास वय २७ वर्षे,रा.आंबेडकर वार्ड,लाखांदूर असे तथाकथित डॉक्टरचे नाव आहे.ही कारवाई दोन दिवसांपूर्वी गुरुवारी दि.२७ जून रोजी करण्यात आली.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,पश्चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यातील कृष्णनगर बनगाव येथील मूळ रहिवासी असलेल्या अरिदम बिश्वास यांनी काही दिवसांपूर्वी लाखांदूर येथील आंबेडकर वॉर्डामध्ये भाड्याच्या घरात आपले खासगी रुग्णालय सुरू केले.काही दिवसांपूर्वी मांदेड येथील रहिवासी महिला रुग्ण मूळव्याध उपचारासाठी त्याच्याकडे गेली होती.यावेळी त्या डॉक्टरने महिला रूग्णाला २५ हजार रुपयांचा खर्च सांगितला.तिच्यावर मूळव्याध रोगाचा उपचार केला.परंतु उपचार करूनही महिला रूग्णाला आजारातून आराम मिळाला नाही.डॉक्टर बोगस असल्याचा संशय घेऊन पीडित महिला रुग्णाने तालुका आरोग्य विभागाकडे तक्रार केली.या तक्रारीवरून तालुका आरोग्य अधिकारी डॉ.वंदना पडोळे,पंचायत समितीच्या बीडीओ नमिता बांगर, ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य अधीक्षक डॉ.दत्तात्रय ठाकरे,आरोग्य विस्तार अधिकारी मोहन बावनकर,डॉ. राजेश मडावी,भरत गणवीर,देमा सोंगे,विनोद मेश्राम, पोलिस हवलदार उमेश शिवनकर,अविनाश खरोले आदी अधिकारी कर्मचाऱ्यांनी काही सरकारी पंचाच्या उपस्थितीत बोगस डॉक्टरचे खासगी रुग्णालय गाठून मेडिकल कौन्सिलच्या नोंदणीबाबत चौकशी केली. यावेळी सदर डॉक्टर रुग्णांवर बेकायदेशीरपणे उपचार करत असल्याचे तसेच महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची नोंदणी न करता औषधोपचार देत असल्याचे उघड झाले.
याप्रकरणी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.वंदना पडोळे यांनी लाखांदूर पोलिस ठाण्यात तक्रार केली. या तक्रारीच्या आधारे ठाणेदार सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.रुग्णालयातून ४० हजार १२६ रुपये किमतीची औषधे व इतर साहित्य जप्त करण्यात आले.या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक परमेश्वर आगासे,पोलिस नायक सुभाष शहारे करीत आहेत.

