उद्रेक न्युज वृत्त
लाखांदूर(भंडारा) :-लाखांदूर तालुक्यातील मानेगाव येथील घराला लागून असलेल्या गोठ्यात बांधून ठेवलेल्या पाळीव जनावरातील एका शेळीची रात्रीच्या सुमारास वाघाने शिकार केल्याची घटना काल,३० मे रोजी सकाळी ६ वाजताच्या सुमारास उघडकिस आली.नामदेव महादेव भंडारकर रा. मानेगाव असे नुकसानग्रस्त पशुपालकाचे नाव आहे. प्राप्त माहिती नुसार,नामदेव हा अल्पभूधारक शेतकरी असून शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालनाचा व्यवसाय करीत आहे.घटनेच्या दिवशी नामदेवने नेहमी प्रमाणे जनावरे व शेळ्या दिवसभर चराई करून आणल्यानंतर घराला लागून असलेल्या गोठ्यात बांधून ठेवलेले होते.मात्र,दिनांक- ३० मे रोजी सकाळी ६ वाजताच्या दरम्यान नेहमी प्रमाणे नामदेव घरची जनावरे व शेळ्या सोडण्यासाठी गोठ्याकडे गेला असता त्याला वाघाने शेळीची शिकार केल्याचे दिसून आले.याची माहिती लाखांदूर येथील वनविभागाला मिळताच वनपरीक्षेत्र अधिकारी रुपेश गावित यांच्या मार्गदर्शनात वन कर्मचारी यांनी घटना स्थळावर येऊन घटनेचा पंचनामा केला.यावेळी त्वरित नुकसान भरपाई देण्याची मागणी पिडीत पशुपालकाने केली आहे.मानेगाव हे अगदी जंगलाला लागून असून येथे नेहमीच गावात वाघ येत असल्याचे सांगण्यात येत आहे.गावाच्या मध्यभागी पशुपालक नामदेव यांचे घर आहे.यागावाच्या मध्यभागात वाघाने येऊन शेळीची शिकार केल्याने गावात दहशतीचे वातावरण पसरले आहे.

