उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :- नागपूरमध्ये भर दुपारी काळोख दाटून आले.वादळी वारे आणि विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली.दिवसाच अंधार पडल्याने वाहनांना दिवे लावून वाहने चालवावी लागली.शहर आणि परिसरात दुपारी तीन वाजल्यानंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाली.
आज,सोमवारी १७ जून रोजी दुपारी नागपूर शहरातील अनेक भागात जोरदार पाऊस सुरु झाला. विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. हवामान विभागकडून यलो अलर्ट दिला होता; परंतु हा मान्सूनचा पाऊस नसून सर्वसाधारण परिस्थितीमुळे तयार झालेले ढग असल्याचे हवामान विभागाने कळविले आहे.
हवामान विभागानुसार,मान्सूनला पोषक वातावरण तयार झाले नसल्याने अजून पूर्व विदर्भात मान्सूनचा पाऊस आलेला नाही.आज,सोमवारी दुपारी अवकाळी पावसाने हजेरी लावली.जोरदार सोसाट्याचा वारा आणि विजेच्या कडकडाटसह जोरदार पाऊस झाला.
नागपूर शहरामध्ये मागील काही दिवसांपासून ४१ अंशांच्या वर तापमान गेले होते.सोमवारी झालेला पाऊस हा नक्कीच उकाड्यापासून दिलासा देणारा आहे.मात्र शेतकऱ्यांना अजूनही मान्सूनच्या पावसाची प्रतीक्षा आहे.शहरामध्ये अचानक पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.

