उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :- नागपुरात एक किळसवाणा प्रकार उघडकीस आला आहे.अवघ्या एका दिवसाच्या नवजात बालिकेला प्लास्टिकच्या थैलीत बांधून उकिरड्यात फेकण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.तिच्या रडण्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या तरुणाचे लक्ष गेले व त्यामुळे तिचे प्राण वाचले. अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या नवजात बाळाला कुठेतरी सोडून मोकळे होण्याचा हा प्रकार असावा; अशी चर्चा परिसरात रंगू लागली आहे.
अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कुंजीलालपेठ परिसरात ही घटना घडली.गेडामकर यांच्या घराच्या बाजूला असलेली गल्ली फारशी वापरात नसल्याने तेथे कचरा पसरला आहे.रात्री कुणीतरी अंधारात नवजात बालिकेला प्लास्टिकच्या थैलीत टाकून तेथे आणून टाकले.भुकेने कासावीस झाल्यानंतर ती रडायला लागली.सकाळी सहा वाजताच्या सुमारास तेथून जाणाऱ्या एका तरुणाला तो आवाज ऐक आला.त्याने शोध घेतला असता कचऱ्यात ती बालिका दिसून आली.या प्रकाराची माहिती पोलिसांना देण्यात आली.तिला मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले.डॉक्टरांनी तिच्यावर उपचार केले.ती आता सुखरूप आहे.परिसरातील नागरिक अनिल लुटे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी हा प्रकार करणाऱ्या अज्ञात माता-पित्याविरोधात गुन्हा नोंदविला असून त्यांचा शोध सुरू आहे.

