Saturday, October 3, 2026
Homeगडचिरोलीकेवळ इमारती,दुरुस्ती आणि भौतिक सुविधा निर्माण करणे अंतिम उद्दिष्ट नसून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण...

केवळ इमारती,दुरुस्ती आणि भौतिक सुविधा निर्माण करणे अंतिम उद्दिष्ट नसून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणे गरजेचे-शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर – ‘आदर्श’ व ‘पीएम श्री’ शाळांच्या कामांचे मूल्यमापन करून जबाबदारी निश्चित करण्याचे निर्देश..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-केंद्र व राज्य शासनाकडून शाळांच्या पायाभूत सुविधा आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या निधीचा वेळेत व उद्देशानुरूप विनियोग झाला पाहिजे आणि त्याचे ठोस परिणाम शाळांच्या शैक्षणिक गुणवत्तेत दिसले पाहिजेत.विशेषतः ‘आदर्श’ व ‘पीएम श्री’ शाळांसाठी मंजूर निधीतून झालेल्या कामांचे मूल्यमापन करून प्रलंबित कामांची कारणे शोधावीत आणि संबंधितांची जबाबदारी निश्चित करावी.तसेच जिल्ह्यातील किमान १०० विद्यार्थ्यांना ‘इस्रो’च्या अभ्यासभेटीसाठी पाठविण्याचे नियोजन करावे,असे निर्देश राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी दिले.
आज,रविवार १६ ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद सभागृहात आयोजित शालेय शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.यावेळी आमदार डॉ. मिलिंद नरोटे,ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राहुल काळभोर,माध्यमिक शिक्षणाधिकारी वासुदेव भुसे,प्राथमिक शिक्षणाधिकारी बाबासाहेब पवार, डायटचे प्राचार्य चाफले तसेच सर्व गटशिक्षणाधिकारी व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत आदर्श शाळा,पीएम श्री शाळा,जिल्हा नियोजन समितीमधून करण्यात येणारी शाळा दुरुस्ती व बांधकामे,निधीचा विनियोग,विद्यार्थी पटसंख्या, शैक्षणिक गुणवत्ता,अधिकाऱ्यांच्या शाळाभेटी,शिक्षक प्रशिक्षण आणि विज्ञानविषयक उपक्रमांचा डॉ.भोयर यांनी सविस्तर आढावा घेतला.
  • आदर्श शाळांच्या प्रलंबित कामांचा खुलासा मागवा👇
जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात १६ शाळांची आदर्श शाळा म्हणून निवड करण्यात आली होती.या शाळांसाठी उपलब्ध झालेला निधी,शाळानिहाय मंजूर कामे, प्रत्यक्ष खर्च,पूर्ण व अपूर्ण कामे तसेच अखर्चित निधी याबाबत डॉ.भोयर यांनी माहिती घेतली.काही कामे प्रलंबित राहिल्याचे तसेच निधी परत गेल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर त्यांनी त्याची गंभीर दखल घेत संबंधितांकडून खुलासा मागविण्याचे निर्देश दिले.
गडचिरोलीसारख्या जिल्ह्याच्या विकासासाठी शासन निधी उपलब्ध करून देत असतांना तो अखर्चित राहता कामा नये.संबंधित अधिकाऱ्यांना आपल्या अखत्यारीतील शाळा,मंजूर निधी,झालेला खर्च, प्रलंबित कामे आणि त्यामागील अडचणी यांची अद्ययावत माहिती असणे आवश्यक आहे.आदर्श शाळांच्या कामांचा शाळानिहाय आढावा घेऊन प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावावीत,असे त्यांनी सांगितले.आदर्श शाळांच्या दुसऱ्या टप्प्यात आणखी सहा शाळांची निवड झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
  • ‘पीएम श्री’ शाळांचा नियमित आढावा घ्या👇
जिल्ह्यात एकूण २४ ‘पीएम श्री’ शाळा असून त्यामध्ये ११ प्राथमिक,९ उच्च प्राथमिक आणि ४ माध्यमिक शाळांचा समावेश आहे.सन २०२५-२६ मध्ये या शाळांसाठी ३ कोटी ४८ लाख ४८ हजार ९९७ रुपये प्राप्त झाले असून त्यापैकी १ कोटी ६२ लाख २० हजार ५५८ रुपये खर्च झाल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
‘पीएम श्री’ शाळांमध्ये उपलब्ध निधीतून कोणत्या सुविधा निर्माण झाल्या,त्या सुविधांचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी किती उपयोग होत आहे,शैक्षणिक गुणवत्तेत काय बदल झाला आणि विद्यार्थी पटसंख्येवर त्याचा काय परिणाम झाला,याचे नियमित मूल्यमापन करावे.शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शाळांना भेटी देऊन या बाबींची पडताळणी करावी,असे निर्देश डॉ.भोयर यांनी दिले.
यावेळी पीएम श्री जवाहरलाल नेहरू उच्च प्राथमिक शाळा,नगर परिषद गडचिरोलीचे मुख्याध्यापक सुधीर गोहणे यांनी शाळेतील उपक्रमांचे सादरीकरण केले. पीएम श्री योजनेतून शाळेत गणित व विज्ञान किट, ‘बाला’ (Building as Learning Aid),ग्रीन स्कूल, ग्रंथालय,क्रीडा साहित्य आणि रोबोटिक्स लॅब यांसह विविध सुविधा विकसित करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.या शाळेत बालवाटिका ते इयत्ता नववीपर्यंत सध्या १ हजार २२७ विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचेही त्यांनी सांगितले.
या शाळेचे उदाहरण देत डॉ.भोयर म्हणाले की, उपलब्ध निधी आणि संसाधनांचा योग्य उपयोग करून जिल्ह्यातीलच एखादी शाळा उत्तम कामगिरी करू शकते,तर इतर शाळांनाही तसे करणे शक्य आहे. शासनाकडून विशेष निधी उपलब्ध झालेल्या आदर्श आणि पीएम श्री शाळा या अन्य शाळांसाठी खऱ्या अर्थाने आदर्श ठरल्या पाहिजेत.
  • कमी पटसंख्येच्या ६४२ शाळांची कारणमीमांसा करा👇
जिल्ह्यातील विद्यार्थी पटसंख्येचाही बैठकीत सविस्तर आढावा घेण्यात आला.अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार १० पर्यंत पटसंख्या असलेल्या ३२५,तर ११ ते २० पटसंख्या असलेल्या ३१७ अशा एकूण ६४२ शाळांमध्ये पटसंख्या २० पर्यंत आहे.
कमी पटसंख्येसाठी सर्व ठिकाणी केवळ कमी लोकवस्ती हे एकच कारण असू शकत नाही.काही ठिकाणी खासगी शाळांकडे पालकांचा वाढलेला कल, शैक्षणिक गुणवत्ता तसेच स्थानिक परिस्थितीनुसार अन्य कारणे असू शकतात.त्यामुळे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेने(DIET)अशा शाळांचे शाळानिहाय विश्लेषण करून पटसंख्या कमी होण्याची नेमकी कारणे शोधावीत आणि विद्यार्थी संख्या व शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी कृती आराखडा तयार करावा,असे निर्देश डॉ.भोयर यांनी दिले.
  • अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शाळाभेटींवर भर द्यावा👇
शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची जबाबदारी केवळ प्रशासकीय कामकाजापुरती मर्यादित नाही.शाळांना नियमित भेटी देऊन शिक्षक प्रत्यक्ष अध्यापन कसे करतात,विद्यार्थ्यांची उपस्थिती किती आहे,पटसंख्या वाढविण्यासाठी कोणते प्रयत्न होत आहेत आणि उपलब्ध सुविधांचा वापर कसा केला जात आहे,याची तपासणी करणे आवश्यक असल्याचे डॉ.भोयर यांनी स्पष्ट केले.
शासनाकडून आवश्यक निधी व पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतर त्यांचा परिणामकारक वापर करून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची जबाबदारी स्थानिक शिक्षण यंत्रणेची आहे.त्यामुळे चांगली कामगिरी करणाऱ्या शाळांचे मूल्यमापन करून त्यांची कार्यपद्धती इतर शाळांपर्यंत पोहोचवावी.अपेक्षित कामगिरी होत नसलेल्या ठिकाणी कारणे शोधून जबाबदारी निश्चित करावी, असे त्यांनी सांगितले.
DIET मार्फत आयोजित प्रशिक्षण आणि अभ्यास दौऱ्यांचा प्रत्यक्ष शाळांमध्ये काय परिणाम झाला, प्रशिक्षण घेतलेल्या शिक्षकांनी त्यातील बाबींची कितपत अंमलबजावणी केली आणि त्यातून शैक्षणिक गुणवत्तेत कोणता बदल झाला,याचेही मूल्यमापन करण्यात यावे.केवळ प्रशिक्षण आयोजित करण्याऐवजी त्याचे फलित तपासण्यावर भर देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
  • निधीबरोबर गुणवत्तापूर्ण शिक्षणही महत्त्वाचे👇
जिल्हा नियोजन समितीमधून शाळा दुरुस्ती व इमारत बांधकामासाठीही मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत आहे.केवळ इमारती,दुरुस्ती आणि भौतिक सुविधा निर्माण करणे हे अंतिम उद्दिष्ट नसून त्या सुविधांचे जतन,त्यांचा प्रभावी वापर आणि विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणे हे महत्त्वाचे असल्याचे डॉ.भोयर यांनी सांगितले.
गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाला शासनाकडून विशेष महत्त्व दिले जात आहे.त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक अधिकाऱ्याने आपल्या विभागात परिणामकारक कामगिरी करणे अपेक्षित आहे. शासनाच्या योजना आणि धोरणांची प्रभावी अंमलबजावणी करून त्याचे परिणाम प्रत्यक्ष शाळा व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले पाहिजेत,असे त्यांनी स्पष्ट केले.
  • १०० विद्यार्थ्यांना ‘इस्रो’ अभ्यासभेटीची संधी द्या👇
विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानविषयक जिज्ञासा,वैज्ञानिक दृष्टिकोन आणि संशोधनाची आवड निर्माण करण्यासाठी विज्ञान प्रदर्शन व स्पर्धांच्या माध्यमातून गुणवंत विद्यार्थ्यांना देशातील नामांकित विज्ञान संस्थांना भेट देण्याची संधी उपलब्ध करून द्यावी,असे डॉ.भोयर यांनी सांगितले.
‘मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी योजना’ तसेच तालुका व जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनांच्या अनुषंगाने गुणवंत विद्यार्थ्यांची निवड करावी.जिल्ह्यातील किमान १०० विद्यार्थ्यांना भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या(इस्रो)अभ्यासभेटीसाठी पाठविण्याचे नियोजन करावे.यासाठी आवश्यक प्रस्ताव तयार करून जिल्हा नियोजन समितीमधून आर्थिक तरतूद करण्याच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांशी समन्वय साधावा,असे निर्देश त्यांनी दिले.
शासनाकडून उपलब्ध होणारा निधी,पायाभूत सुविधा, प्रशिक्षण आणि विविध शैक्षणिक उपक्रमांचा केंद्रबिंदू विद्यार्थी असला पाहिजे.प्रत्येक योजनेचे फलित विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणात आणि शाळांच्या कामगिरीत दिसले पाहिजे,असे डॉ.भोयर यांनी स्पष्ट केले.यावेळी जिल्हा परिषदेचे वरिष्ठ अधिकारी तसेच शालेय शिक्षण संबंधित अधिकारी उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धावत्या पिकअप वाहनाचा अपघात; नऊ जण गंभीर जखमी,तर आठ जण किरकोळ जखमी..

उद्रेक न्युज वृत्त :-पोटाची खळगी भरण्यासाठी बाहेर जिल्ह्यात निघालेल्या मजुरांच्या वाहनाचा अपघात झाल्याची घटना आज,शनिवार ३ ऑक्टोंबर रोजी पहाटेच्या सुमारास अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासर पोलिस...

काँग्रेसकडून विधान परिषद निवडणुकीसाठी तीन उमेदवारांची घोषणा.. -नागपूर पदवीधर मतदार संघासाठी अभिजीत वंजारी यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच मंगळवार २२ सप्टेंबर २०२६ रोजी निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा  केली.यामध्ये नागपूर पदवीधर...

राहत्या घरातच सुरू होता देहव्यापाराचा अड्डा; पोलिसांची धाड.. – दोन पिडीत महिलांची सुटका,तर दोन महिलांना अटक..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-राहत्या घरात देहव्यापाराचा अड्डा चालवणाऱ्या दोन महिलांना अटक करण्यात चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास यश आले आहे.या प्रकरणी घटनास्थळावरून आरोपींच्या ताब्यातून...

संशयाच्या भुताने झपाटलेल्या पतीने केली पत्नीची हत्या; शवविच्छेदन अहवालात फुटले बिंग..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-संशयाचा भूत भल्या-भल्यांना नरकात धाडत असतो.तो एकदा कां अंगात शिरला,तर कधी काय होणार हे सांगणे अवघड आहे.अश्याच प्रकारे संशयाच्या भुताने झपाटलेल्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!