- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-जिल्ह्याच्या कोरची तालुक्यात आज, शनिवारी सायंकाळच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली.एका धावत्या ट्रॅक्टरला ट्रकने मागून जोरदार धडक दिल्याने ट्रॅक्टरचा चेंदामेंदा होऊन दोन तरुणांचा मृत्यू झाला,तर तिघे जखमी झाल्याची घटना कोरची तालुका मुख्यालयापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावरील कोरची-मोहगाव फाट्याजवळ घडली.अपघातात कैलास कोवे वय ३५ वर्षे रा.मोहगाव/वाकडी,ता.कुरखेडा,जि.गडचिरोली व सागर कल्लो वय २० वर्षे,रा.झेंडेपार,ता.कोरची असे मृत पावलेल्या तरुणांची नावे असून पुरुषोत्तम मडकाम वय ५१ वर्षे रा.चिचोली,ता.अर्जुनी-मोरगाव, जि.गोंदिया,राजेश गंगभोईर वय २८ वर्षे रा.चमरोटोला,ता.मोहल्ला (छत्तीसगड)व प्रदीप नैताम वय २४ वर्षे रा.चीचटोला अशी जखमींची नावे आहेत.यातील दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारार्थ गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
कोरची तालुक्याच्या झेंडेपार गावाजवळ सिमेंट बंधाऱ्याचे काम सुरु असल्याने चांदोना येथून सेंट्रींग घेऊन एमएच ४०-बी ९५७३ क्रमांकाच्या ट्रॅक्टरने पाचजण कामावर जात होते.अश्यातच सीजी ०७-बीए ९२८४ क्रमांकाचा ट्रक हा हैदराबाद येथून निघाला व कोरची मार्गाहून रायपूरकडे जाण्यासाठी निघाला होता. दरम्यान,ट्रकने मोहगाव फाट्याजवळ ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली.धडक इतकी जोरदार होती की,ट्रॅक्टरचा चेंदामेंदा तर झालाच,मात्र ट्रॅक्टरखाली मजूर दबल्या गेल्याने एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला,तर एकास रुग्णालयात नेत असतांना वाटेतच मृत्यू झाला.घटनेची माहिती होताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांना माहिती दिली.माहिती मिळताच बेळगाव पोलिस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी दिनेश खटोले, कोरची पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शैलेंद्र ठाकरे, पोलीस उपनिरीक्षक मुकुंद देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले.जखमींवर डॉ.चेतना सिडाम,डॉ.शिव पुंडे यांनी प्रथमोपचार केले. मात्र,कोरचीच्या ग्रामीण रुग्णालयाची १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका चंद्रपूरला दुरुस्तीसाठी गेल्याने कुरखेडा येथील रुग्णवाहिका बोलावून जखमींना गडचिरोलीला हलविण्यात आले.प्रसंगी ट्रक चालक घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्नात असतांना पोलिसांनी ट्रक चालक अभिषेक शर्मा वय ३० वर्षे, रा.चितवाडा, जि.बालीया,उत्तरप्रदेश यास ट्रकसह ताब्यात घेत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू केली.
- Advertisement -

