- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-पुणे येथे पार पडलेल्या २४ व्या राज्यस्तरीय ‘ज्युनियर वुशू स्पर्धा-२०२६’ मध्ये अहेरी तालुक्यातील वांगेपल्ली येथील शासकीय निवासी शाळेचा इयत्ता दहावीचा विद्यार्थी मोहन मलया कोंडागोरला याने उत्कृष्ट कामगिरी करत कांस्यपदक पटकाविले.वुशूच्या ‘ताओलू-नानगुन’ प्रकारात त्याने ही कामगिरी केली असून,राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठीही तो पात्र ठरला आहे.वुशू स्पर्धा म्हणजे चीन मधील पारंपरिक मार्शल आर्ट,ज्याला ‘कुंग फू’ असेही म्हटले जाते.
अतिदुर्गम व आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्याने राज्यस्तरीय वुशूसारख्या स्पर्धेत पदक मिळवून राष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारल्याने जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रासाठी ही उल्लेखनीय कामगिरी ठरली आहे. मोहनने सातत्यपूर्ण सराव,मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर राज्यस्तरीय स्पर्धेत आपली छाप पाडली आहे. या कामगिरीमुळे मोहन हा क्रीडा क्षेत्रातील ५ टक्के आरक्षणासाठी आवश्यक पात्रतेच्या अनुषंगानेही पात्र ठरला असल्याची माहिती समाज कल्याण विभागाने दिली आहे.त्याच्या या यशामध्ये प्रशिक्षक यश पडेलवार यांचे मार्गदर्शन महत्त्वपूर्ण ठरले.त्यांनी मोहनच्या तांत्रिक प्रशिक्षणासह नियमित सरावावर विशेष मेहनत घेतली.
मोहनच्या या यशाबद्दल समाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ-मुंडे,जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा,समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त प्रसाद कुलकर्णी आणि सहाय्यक आयुक्त डॉ.सचिन मडावी यांनी त्याचे अभिनंदन करून राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
- शंभरहून अधिक विद्यार्थ्यांना राज्यस्तरावर पोहोचविण्याचे उद्दिष्ट👇
जिल्ह्यातील शासकीय निवासी शाळांमधील विद्यार्थ्यांच्या क्रीडागुणांना संधी मिळावी आणि दुर्गम भागातील विद्यार्थी विविध खेळांमध्ये जिल्हा व राज्यस्तरावर पुढे यावेत,यासाठी समाज कल्याण विभागाकडून यंदा विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.विविध क्रीडा प्रकारांसाठी विद्यार्थ्यांचे नियमित सराव आणि प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे.
यावर्षी विविध क्रीडा प्रकारांमध्ये जिल्ह्यातील शंभर हून अधिक विद्यार्थ्यांना राज्यस्तरावर उल्लेखनीय कामगिरी करण्यासाठी सक्षम करण्याचे उद्दिष्ट समाज कल्याण विभागाने ठेवले आहे.विद्यार्थ्यांमधील क्रीडागुण ओळखून त्यांना योग्य प्रशिक्षण व स्पर्धात्मक संधी उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येत आहे.
वांगेपल्लीसारख्या दुर्गम भागातील शासकीय निवासी शाळेच्या मोहनने वुशू या क्रीडा प्रकारात राज्यस्तरीय पदक मिळवत राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्रता मिळविल्याने या प्रयत्नांना प्रोत्साहन मिळाले असल्याचे डॉ.सचिन मडावी यांनी सांगितले.
- Advertisement -

