- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-शहरात राहून उच्च शिक्षण घेणे आणि करिअर घडवणे अनेकांसाठी सोपे असते,कारण तिथे सर्व सोयी-सुविधा उपलब्ध असतात.पण,महाराष्ट्रातील सर्वात मागासलेल्या आदिम जमातींपैकी एक असलेल्या गडचिरोली जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम गावातून डॉक्टर बनण्याचे स्वप्न पूर्ण करणे,ही खरोखरच कौतुकास्पद अभिमानाची बाब आहे.अश्यातच भामरागड तालुक्याच्या कारमपल्लीचा देवदास, मल्लमपोडूरची सानिया आणि दुब्बागुड्याचा गुरुदास यांनी हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवले आहे.
शनिवार १४ जून रोजी जाहीर झालेल्या नीट (NEET) परीक्षेच्या निकालात भामरागड तालुक्यातील तीन विद्यार्थ्यांनी आपली चमक दाखवली आहे.देवदास मंगू वाचामी (४७२ गुण),सानिया तुकाराम धुर्वे (३६४ गुण),आणि गुरुदास गिसू मिच्चा (३४८ गुण) अशी त्यांची नेत्रदीपक कामगिरी आहे.फोटोतील डावीकडून देवदास,सानिया आणि उजवीकडून गुरुदास या तिघांनीही उत्तुंग भरारी घेत तालुक्याचे नाव लौकीक केले आहे.सानिया आणि गुरुदास यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण आदिवासी विकास विभागाच्या नामांकित शाळा उपक्रमांतर्गत अनुक्रमे ग्लोबल इंग्लिश मीडियम स्कूल, आलापल्ली आणि ज्ञानदीप हायस्कूल,सिरोंचा येथे झाले होते.या तिन्ही विद्यार्थ्यांनी धाराशिवच्या ‘उलगुलान’ येथून नीट परीक्षेचे मार्गदर्शन मिळवले.
- प्रशासनाकडून विद्यार्थ्यांचा गौरव👇
या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,भामरागडमार्फत त्यांच्या घरी जाऊन करण्यात आला.प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी नमन गोयल यांनी सानियाशी संवाद साधतांना तिला भविष्यात कुठे सेवा देणार याबद्दल विचारले.त्यावर सानियाने,शहरात अनेक डॉक्टर उपलब्ध असले तरी,तिच्या गावात कुणीही डॉक्टर यायला तयार नसतात,त्यामुळे तिला आपल्या दुर्गम गावातच सेवा द्यायची आहे,अशी इच्छा व्यक्त केली. गोयल यांनी विद्यार्थ्यांना भविष्यात कोणत्याही अडचणीत प्रकल्प कार्यालयाकडून पूर्ण सहकार्य मिळेल,अशी ग्वाही दिली.सहाय्यक प्रकल्प अधिकारी रोषना चव्हाण यांनी देवदास आणि गुरुदास यांच्या गावी जाऊन त्यांची भेट घेतली.या दोघांनीही सानियासारखेच विचार व्यक्त केले आणि आपल्या गावाची सेवा करण्याची इच्छा दर्शवली.
- प्रतिकूल परिस्थितीतून प्रेरणादायी यश👇
या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करतांना त्यांच्या पालकांचाही शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.विशेष म्हणजे,देवदास आणि गुरुदास यांचे वडील अल्पभूधारक शेतकरी आहेत.तर सानियाचे वडील मल्लमपोडूर येथील शेतीत उत्पन्न नसल्यामुळे सूरजागड लोहखनिज प्रकल्पात ट्रक चालक म्हणून काम करतात.घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असतांनाही या मुलांनी मिळवलेले हे यश प्रत्येकासाठी एक मोठा धडा आहे.अतिमागास समजल्या जाणाऱ्या माडिया,आदिम जमातीतील या विद्यार्थ्यांचे यश हे येणाऱ्या पिढ्यांसाठी एक मैलाचा दगड आणि यशाची नांदीच आहे,असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.त्यांच्या या यशाने अनेक विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल आणि दुर्गम भागातूनही मोठी स्वप्ने पाहण्याची आणि ती पूर्ण करण्याची जिद्द त्यांना मिळेल.
- NEET म्हणजे काय?👇
NEET म्हणजे National Eligibility cum Entrance Test म्हणजेच राष्ट्रीय पात्रता सह परीक्षा.सदरची परीक्षा ही वैद्यकीय अभ्यासक्रमातील प्रवेशाकरिता घेतली जाते.जसे,डॉक्टर बनू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना MBBS,BDS व इतर वैद्यकीय क्षेत्राकरीता नीट ही परीक्षा द्यावी लागते.सदरची परीक्षा ही सर्वात कठीण मानली जाते,ज्यात दरवर्षी अंदाजे १० लाखाच्यावर विद्यार्थी या परीक्षेस बसतात.सदरची परीक्षा पास होणाऱ्या विद्यार्थ्यांना भारतातील विविध वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळत असतो.सदरची परीक्षा ही ७२० गुणांची असते.यासाठी जीवतोड मेहनत घ्यावी लागते आणि जीवनाचे सोने स्वतःच करून घ्यावे लागत असते.
- Advertisement -

