- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :-इन्फार्मड व्होटर प्रोजेक्ट या राजकारणातील पारदर्शकता व उत्तरदायित्व वाढीसाठी कार्यरत सामाजिक संस्थेने अलीकडेच राज्यातील विद्यमान आमदार व निवडणुकीच्या रिंगणात असलेले उमेदवार यांच्या संपत्तीचे विश्लेषण करणारा अहवाल जाहीर केला आहे.संस्थेचे संस्थापक विश्वस्त विवेक गिलानी यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.केवळ मतदान करू नका तर योग्य लोकप्रतिनिधीची निवड करा; असे आवाहनही संस्थेने केले आहे.
केवळ मुंबईतील आमदारांच्या संपत्तीत गेल्या चार वर्षांत झालेल्या वाढीचा विचार करता महायुतीच्या आमदारांच्या संपत्तीत सामान्य भारतीयांच्या ४३ पट तर महाविकास आघाडीच्या आमदारांच्या संपत्तीत ६ पट वाढ झाली आहे.महायुतीच्या आमदारांच्या संपत्तीत गेल्या ५ वर्षांत १२० टक्के वाढ झाली असून त्यांची संपत्ती २१.५ कोटींहून ४७.१ कोटींवर पोहोचली आहे तर महाविकास आघाडीच्या आमदारांची संपत्ती ६२ टक्क्यांनी वाढली असून १६.४ कोटींहून २६.५ कोटींवर पोहोचली आहे.
राज्यातील सत्ताधारी महायुतीच्या उमेदवारांकडील अतिरिक्त संपत्तीचे वाटप सामाजिक कार्यासाठी करायचे ठरविले तर राज्यातील समाज कल्याणाच्या योजना राबविण्यासाठी ७ हजार ३७५ कोटी उपलब्ध होतील.उदाहरणार्थ एक अंगणवाडी चालवायला ७ ते १२ लाख वार्षिक खर्च येतो.महायुतीच्या २८८ उमेदवारांकडील अतिरिक्त संपत्तीचा अंगणवाडीवर खर्च करायचा ठरविल्यास ७७ हजार ६३८ उभारल्या जाऊ शकतील.सध्या राज्यात अंगणवाडींची संख्या अतिशय कमी आहे.हा अतिरिक्त पैसा मुलांच्या आरोग्याची व सर्वसाधारण काळजी घेण्यावर खर्च केला तर ४६.६ लाख मुले व त्यांचे कुटुंब यांची काळजी घेणे शक्य होईल.
अहवालातील निष्कर्ष👇
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांची सरासरी संपत्ती २६.५ कोटी आहे.महायुतीच्या सर्व उमेदवारांची सरासरी संपत्ती ४७.१ कोटी आहे.
२०१९ ते २०२४ या पाच वर्षांच्या काळात महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या सरासरी संपत्तीत १८ टक्के तर महायुतीच्या उमेदवारांच्या सरासरी संपत्तीत ५९ टक्के वाढ झाली आहे.
एकीकडे सर्वसामान्य भारतीय व्यक्तीच्या संपत्तीत केवळ ०.७ टक्के वाढ झाली असतांना राज्यातील सत्ताधारी महायुतीच्या आमदारांच्या संपत्तीत १७ पटींनी तर महाविकास आघाडीच्या आमदारांच्या संपत्तीत ५ पटींनी वाढ झाली आहे.
या आमदारांच्या संपत्तीत झाली वाढ👇
भाजप आमदारांच्या संपत्तीत सर्वाधिक १४४ टक्के वाढ झाली आहे.२६ कोटींहून त्यांची संपत्ती ६४ कोटींवर पोहोचली आहे.
काँग्रेस आमदारांच्या संपत्तीत ४० टक्के वाढ झाली असून २१.७ कोटींहून त्यांची संपत्ती ३०.५ कोटींवर पोहोचली आहे.
संपत्तीच्या वाढीचा सर्वाधिक दर असलेल्या पहिल्या २० आमदारांमध्ये १४ आमदार महायुतीचे तर ६ आमदार महाविकास आघाडीचे आहेत.
- Advertisement -

