- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-रेकॉर्डवरील ठोस पुराव्यांवरून गुन्हा सिद्ध झाल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने साळ्याची हत्या करणाऱ्या भाऊजी व त्याच्या मित्राची जन्मठेपेसह इतर शिक्षा कायम ठेवली.हा निर्णय न्यायमूर्तीद्वय विनय जोशी व वृषाली जोशी यांनी काल,मंगळवारी जाहीर केला.कमलेश नारायण दुबे वय ३५ वर्षे व शेखर चंद्रकिशोर दुबे वय ३५ वर्षे अशी आरोपींची नावे असून,ते सूरजनगर, नंदनवन येथील रहिवासी आहेत.मृताचे नाव सुमित कांबळे असे होते.हे तिघेही शहरातील कचरा गोळा करणारे कंत्राटदार कनक रिसोर्सेस कंपनीसाठी वाहनचालक म्हणून काम करीत होते.कमलेश सोबत सुमितची बहीण तनू हिचे प्रेमसंबंध होते.त्याला सुमितचा विरोध होता.त्यामुळे कमलेश व तनूने घरातून पळून जाऊन लग्न केले होते. परिणामी,सुमित कमलेशचा राग करीत होता.त्यांचे नेहमीच भांडण होत होते.१९ सप्टेंबर २०१७ रोजी दुपारी सुमित,त्याचे मित्र राहुल देशमुख व योगीराज दुचाकीने भांडेवाडी डम्पिंग यार्डात गेले होते.दरम्यान,दोन्ही आरोपीही कचऱ्याची गाडी घेऊन तेथे पोहोचले.त्यावेळी कमलेश व सुमितचा वाद झाला.त्यानंतर शेखरने सुमितवर चाकूने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले.सुमितने पळण्याचा प्रयत्न केला असता कमलेशने त्याला पकडून पुन्हा चाकूने वार केले.सुमित जमिनीवर कोसळल्यावर कमलेशने कचऱ्याच्या गाडीने त्याला चिरडले.
आरोपींचा सुमितची हत्या करण्याचाच उद्देश होता,हे पुराव्यांवरून दिसून येते.दोघेही धारदार चाकू सोबत घेऊन गेले होते.त्यांनी सुमितच्या नाजूक अंगांवर चाकूचे वार केले.ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर सुमित जमिनीवर निपचित पडल्यानंतर कमलेशने त्याला कचऱ्याच्या गाडीने चिरडले.त्यामुळे आरोपी हत्येच्या गुन्ह्याकरिताच दोषी आहेत व त्यांना सुनावली गेलेली शिक्षा योग्य आहे; असे उच्च न्यायालयाने निर्णयात स्पष्ट केले.
सत्र न्यायालयामध्ये सरकार पक्षाने तीन प्रत्यक्षदर्शीसह दहा साक्षीदार तपासले.सत्र न्यायालयाने साक्षीदारांचे जबाब व इतर पुराव्यांच्या आधारावर आरोपींना हत्येच्या गुन्ह्याकरिता दोषी ठरवून जन्मठेप व पाच हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास तीन महिने अतिरिक्त कारावास,अशी शिक्षा सुनावली.त्या निर्णयाविरुद्ध आरोपींनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते.ते अपील गुणवत्ताहीन ठरवून फेटाळण्यात आले.
- Advertisement -

