- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-सहावीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यावर लैंगिक शोषण करणाऱ्या नराधम चौकीदाराला तिहेरी जन्मठेप तर घडलेला प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या शाळेच्या संस्थापकास सहा महिन्याच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.तसेच शिक्षेसह चौकिदारास ४० हजाराचा दंड व संस्थापकाला १० हजाराचा दंड ठोठावण्यात आला आहे.नागपूरच्या बुटीबोरी येथील श्री जगदंब बहुउद्देशीय मागासवर्गीय संस्थेद्वारे संचालित होलीक्रॉस इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्याचे लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणात दोन्ही आरोपींना नागपूरच्या विशेष न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे.
न्यायाधीश जे.ए.शेख यांनी हा निर्णय दिला आहे. चौकीदार होमदेव उत्तम पडोळे बामणी,ता.पवनी, जि.भंडारा आणि संस्थापक अरुण शंकरराव हुसुकले रामनगर,नागपूर अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत.
सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला भेटण्यासाठी त्याचे वडील हे १९ डिसेंबर २०१६ रोजी शाळेत गेले होते. चौकीदाराने दूरध्वनीवरून सूचना देऊन संबंधित विद्यार्थ्याला बोलावून घेतले.काही वेळानंतर पालकाने विद्यार्थ्याला खाऊ घेऊन देण्यासाठी बाहेर नेले.बाहेर जाताच विद्यार्थी रडू लागला आणि ‘या शाळेत शिकत नाही’ असे म्हटले.त्यामुळे पालकाने कारण विचारताच गेल्या महिनाभरापासून चौकीदार हा दारू पिऊन लैंगिक अत्याचार करत असल्याचे सांगितले.
सोबतच सदर बाब कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही त्याने दिली होती.याबाबत सदर पालकाने वॉर्डनकडे विचारणा केली असता मुख्याध्यापिकेकडे जाण्यास सांगण्यात आले.
मुख्याध्यापिकेकडे गेल्यावर हा प्रकार सांगितला. त्यांनी त्यानंतर संस्थापक अरुण हुसुकले यांना बोलविले.त्यांनी पालकांसमक्ष पीडित विद्यार्थ्याला याबाबत विचारताच त्याने घडलेला प्रकार सांगत आणखी चार विद्यार्थ्यांनी हा प्रकार बघितल्याचे सांगितले.विशेष न्यायालयाने पीडित विद्यार्थ्याला भरपाई देण्याचेदेखील निर्देश दिले आहेत.मनोधैर्य योजनेअंतर्गत त्याला भरपाई देण्यात यावी व ३० दिवसांत त्याची पूर्तता व्हायला हवी,असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे तसेच आरोपींकडून येणारा दंड हा पीडित विद्यार्थ्याला देण्याचेदेखील निर्देश देण्यात आले आहेत.
संबंधित घटना २२ डिसेंबर २०१६ रोजी उघडकीस आली होती.लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर संस्थाचालकाने ही घटना कुणालाही सांगू नका, सांगितल्यास वाईट होईल,अशी धमकी दिली होती. पीडित विद्यार्थ्याच्या पालकाने बुटीबोरी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली.त्याआधारे भादंविच्या कलम ३७७,५०६,३४ सहकलम ३ (१), (१०),३ (२), (५) अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा तसेच सहकलम ६,८ बाललैंगिक अत्याचार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला होता.या प्रकरणात न्यायालयाने नऊ साक्षीदारांची साक्ष ग्राह्य धरली.या प्रकरणात सरकारच्या वतीने ॲड.रश्मी खापर्डे यांनी कामकाज पाहिले.या निवासी शाळेत पहिली ते दहावीतील विद्यार्थी शिकतात.बहुतांश विद्यार्थी अनुसूचित जमातीतील होते.एखाद्या शिक्षण संस्थेच्या संस्थापकाला अशा प्रकरणामध्ये शिक्षा झाल्याने शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.
- Advertisement -

