उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :- भटक्या जमातीतील नागरिकांचा कुठेही ठाव ठिकाणा नसतो. कधी या गावी तर कधी त्या गावी जाऊन पोटाची खळगी भरून उदरनिर्वाह करीत असतात.त्यामुळे अनेकवेळा त्यांना कागदपत्रांची पूर्तता करता येत नव्हती.भटक्या जमातीतील नागरिकांना रेशनकार्ड मिळण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. परिणामी,राज्यभरातील अनेक बांधव रेशनकार्डपासून वंचित होते.मात्र,आता या जमातीतील बांधवांना रेशनकार्ड मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, केवळ हमीपत्रावर त्यांना रेशनकार्ड मिळणार आहे.शासनाच्या या निर्णयामुळे राज्यभरातील या बांधवांना मोठा दिलासा मिळणार आहे.
गावा गावांत फिरून पोट भरणाऱ्या या समाजातील काही नागरिकांकडे आधारकार्ड,मतदान कार्ड किंवा जन्म दाखल्याबाबत काहीच पुरावा नसल्याने त्यांना शासनाच्या विविध योजनांपासून वंचित राहावे लागते. शासनाद्वारे पुरविण्यात येणारे मोफत धान्यसुद्धा त्यांना मिळत नसल्याची स्थिती आहे.आता मात्र, स्वयंघोषणापत्र किंवा मतदार यादीमध्ये मतदार म्हणून नोंदणी झाल्याचे ओळखपत्र,सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा समाजकल्याण अधिकारी किंवा प्राधिकृत केलेल्या राजपत्रित अधिकाऱ्यांनी भटक्या विमुक्त जमातीचा नागरिक असल्याचे दिलेले प्रमाणपत्र,रहिवासी यासंदर्भात शहरी भागात नगरसेवक आणि ग्रामीण भागात सरपंच,उपसरपंच यांचे त्या भागातील रहिवासाचे प्रमाणपत्र रेशनकार्ड देण्यासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे.त्यामुळे थोडाफार का होईना या समाजातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

