उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :- पवनी तालुक्यातील कन्हाळगाव येथे मोहफूल गोळा करायला जंगलात गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार झाली असल्याची घटना काल, सोमवारी २५ मार्च रोजी पहाटे उघडकीस आली.सिताबाई श्रावण डडमल वय ६० वर्षे रा.कन्हाळगाव असे मृत महिलेचे नाव आहे.
सिताबाई डडमल या चन्नेवाडा कक्ष क्र. ३१६ मध्ये पहाटेच्या सुमारास मोहफुल गोळा करायला गेल्या होत्या.दुपारी पर्यंत घरी परत न आल्यामुळे घरातील व्यक्तींनी शोधाशोध केली.गावातील स्मशानभूमीपासून पाचशे मीटरवर जंगलात मृत अवस्थेत त्या आढळून आल्या.सदर घटनेची माहिती वन विभाग व पोलीस
विभागाला देण्यात आली.घटनास्थळी गावकऱ्यांनी मृतदेह उचलण्यास मज्जाव केल्यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.पोलिसांनी गावकऱ्यांची समजूत काढून मृतदेह शवविच्छेदनाकरिता ग्रामीण रुग्णालय पवनी येथे आणला.यावेळी गावकऱ्यांनी वाघाला जेरबंद करून इतरत्र सोडण्यात यावे; अशी मागणी केली.

