- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार पुढील चार दिवस विदर्भ,मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात थंडी कायम राहणार आहे.सकाळच्या वेळेत दाट धुक्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता असून, त्यामुळे दृश्यमानता कमी होऊ शकते. याचा परिणाम वाहतुकीवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वाहनचालकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.विशेष म्हणजे,नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांना अचानक कोसळलेल्या पावसामुळे थंड वातावरणाचा धक्का बसला.पहाटेच्या सुमारास अचानक आलेल्या पावसाच्या सरींमुळे शहरात एकच गोंधळ उडाला.हवामान खात्याने थंडीचा इशारा दिला असतांनाच पावसाने हजेरी लावल्याने अनेक नागरिकांची धावपळ झाली होती.त्यातच,आता हवामान खात्याच्या अंदाजानुसार,पुढील ४८ तास मुंबई आणि परिसरात आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे.या कालावधीत काही ठिकाणी हलक्या सरी पुन्हा कोसळू शकतात,असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.त्यामुळे नागरिकांनी पुढील दोन दिवस हवामानातील बदल लक्षात घेऊनच घराबाहेर पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे.ढगाळ वातावरणामुळे सूर्यप्रकाश कमी मिळणार असून, थंडीची तीव्रता काहीशी अधिक जाणवू शकते. मात्र,या कालावधीनंतर तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता असून, थंडीचा कडाका थोडा कमी होईल, असेही हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.इशारा केवळ
मुंबईपुरताच नव्हे,तर संपूर्ण महाराष्ट्रात हवामानात मोठा बदल होतांना दिसत आहे.अरबी समुद्रातून येणाऱ्या आद्रतेने भरलेल्या वाऱ्यांसोबतच पश्चिमेकडून वाहणाऱ्या थंड हवेच्या प्रवाहामुळे राज्यातील अनेक भागांत ढगाळ वातावरण तयार झाले आहे.या बदलत्या हवामान पद्धतीमुळे दिवस-रात्रीच्या तापमानात मोठी तफावत दिसून येत आहे.विशेषतः सकाळी आणि रात्री थंडी अधिक जाणवत असून,दुपारच्या वेळेतही गारठा कायम आहे.पुढील काही दिवस राज्यभर थंडीचा प्रभाव अधिक वाढण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये किमान तापमानात मोठ्या प्रमाणावर घसरण नोंदवण्यात आली आहे. परभणी येथे किमान तापमान ६.८ अंश सेल्सिअसपर्यंत खाली गेले असून,यंदाच्या हिवाळ्यातील हे आतापर्यंतचे सर्वात कमी तापमान मानले जात आहे.धुळ्यातही थंडीचा कडाका वाढला असून,तेथील किमान तापमान ७ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले आहे.उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांत थंड वारे सतत वाहत असून,पुढील काही दिवस हीच स्थिती कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.दरम्यान,विदर्भ आणि मराठवाड्यात थंडीचा प्रभाव अधिक तीव्र स्वरूपात जाणवत आहे.नागपूरसह संपूर्ण विदर्भात यंदाचा डिसेंबर हा गेल्या काही वर्षांतील सर्वात थंड महिना ठरल्याचे चित्र आहे.गेल्या पंधरा दिवसांपासून अनेक भागांत किमान तापमान १० अंश सेल्सिअसच्या खाली नोंदवण्यात येत आहे.रात्री आणि पहाटेच्या वेळेत प्रचंड गारठा जाणवत असून,ग्रामीण भागात जनजीवनावर त्याचा परिणाम होतांना दिसत आहे. थंडीमुळे शेतकरी,मजूर आणि लहान मुलांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
- Advertisement -

