उद्रेक न्युज वृत्त :-राजस्थानची राजधानी असलेल्या जयपूरमध्ये अमेरिकेतील एका महिलेची मोठी आर्थिक फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.या महिलेला राजस्थानमधील दुकानाच्या मालकाने ३०० रुपयांचे कृत्रिम दागिने तब्बल ६ कोटी रुपयांना विकून शेंडी लावल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.
महिलेचे नाव आहे चेरीश असून तिने येथील सोने-चांदीच्या दुकानातून सोन्याचे पॉलिश असलेले चांदीचे दागिने खरेदी केले होते.दागिने खरेदी केल्यानंतर ती पुन्हा अमेरिकेला गेली होती.एप्रिल महिन्यात तिने एका प्रदर्शनात हे दागिने ठेवले होते.तथापि,ते बनावट असल्याचे लक्षात आल्यानंतर तिच्या पायाखालची जमीन सरकली.चेरीश ताबडतोब जयपूरला दाखल झाली आणि तिने दुकानाचा मालक गौरव सोनी याला जाब विचारला.मात्र,दुकानमालकाने कानांवर हात ठेवून तिचे आरोप फेटाळून लावले.यानंतर तिने जयपूर पोलिस ठाण्यात सोनीविरुद्ध तक्रार दाखल केली.हे कमी म्हणून की काय तिने अमेरिकेच्या दूतावासाकडेही मदत मागितली.दूतावासाने पोलिसांकडे हे प्रकरण उपस्थित केले आहे.
दुकानमालक वडिलांसह फरारी महिलेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार,२०२२ मध्ये इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ती गौरव सोनीच्या संपर्कात आली होती. गेल्या दोन वर्षांत कृत्रिम दागिन्यांसाठी तिने ६ कोटी रुपये मोजले आहेत.आपला बनाव उघड होणार,या भीतीने गौरव सोनी आणि आणि त्याचे वडील राजेंद्र सोनी फरार झाले आहेत.दोघांचाही शोध सुरू आहे. त्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत; असे पोलिसांनी सांगितले.

