उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :- राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्यातील आरोग्य विभागातील मंजूर बाह्ययंत्रणेव्दारे पदावर भरती करण्यात आलेल्या डाटा एन्ट्री ऑपरेटर्स यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ असताना कंपनी त्यांना दोन वर्षातच त्यांना कार्यमुक्त करणार आहे. यामुळे चार हजार डाटा एन्ट्री ऑपरेटर्सना घरी जावे लागणार आहे.आरोग्य विभागात मे यशस्वी अकॅडमी फॉर स्कील,पुणे या संस्थेच्या माध्यमातून दोन वर्षांपूर्वी तीन वर्षांच्या चार हजार डाटा एन्ट्री ऑपरेटरची नियुक्ती करण्यात आली होती.त्यांना दरमहा ९ हजार रुपये मानधन दिले जाते.करारानुसार कंपनीने ऑपरेटर्सना एक वर्षानंतर १० टक्के,तर दोन वर्षांनंतर १५ टक्के मानधन वाढ देणे अपेक्षित होते.ऑपरेटरला वाढ न देता कार्यमुक्त करण्याची नोटीस कंपनीने दिली आहे. यामुळे महाराष्ट्र डाटा एन्ट्री ऑपरेटर आरोग्य कामगार संघटनेच्या आवाहनानुसार आरोग्य विभागातील कंत्राटी ऑपरेटर संपावर गेले आहेत.

