- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-बँक ग्राहक सेवा केंद्राच्या एका केंद्रचालक युवतीने शक्कल लढवून गरीब लाभार्थी महिलेच्या खात्यातून तब्बल १ लाख ८० हजार रुपयांवर डल्ला मारल्याचा प्रकार नुकताच भिवापूर शहरात उजेडात आला आहे.प्रकरणी लाभार्थी महिलेची रक्कम हडपणाऱ्या केंद्रचालक युवतीला पोलिसांनी ताब्यात घेताच गुन्ह्याची कबुली दिली अन् पैसे परत करण्याची तयारी दर्शवत तक्रार न करण्याची विनंती केली.त्यामुळे पिडीत कुटुंबीयांनी समजदारी घेऊन तक्रार नोंदविली नसल्याने तक्रारीअभावी पोलिसांना देखील गप्प राहावे लागले आहे.
बँकेतील गर्दी टाळण्यासाठी विविध बँकांनी शहरासह ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी बँक ग्राहक सेवा केंद्र सुरू केले आहेत.त्यानुसार,गोरगरीब,वयोवृद्ध लाभार्थी, विशेषतः संजय गांधी निराधार आणि ‘लाडकी बहीण’ योजनांचे ग्राहक,बँक सेवा केंद्रांवरून अनुदानाची रक्कम काढत असतात.अश्याच प्रकारे भिवापूर शहराच्या आझाद चौक येथील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलेने शहरातील बँक ग्राहक सेवा केंद्रचालक युवतीकडून सुरुवातीला दीड हजार रुपये काढले.दीड हजार रुपये काढत असतांनाच लाभार्थी महिलेच्या खात्यात मोठी रक्कम जमा असल्याची माहिती केंद्रचालक युवतीला झाली.त्यामुळे केंद्रचालक युवतीने दर महिन्याला महिलेला फोन करून अनुदान जमा झाल्याचे सांगणे सुरू केले.महिला कामात असल्याने केंद्रात येण्यास असमर्थता दर्शविल्यानंतर,युवतीने तिला ‘घरपोच’ सेवा देण्याचे आमिष दाखवले.घरी जाऊन तिने मशिनवर बोटाचा ठसा घेतला आणि १ हजार ५०० रुपये दिले,परंतु प्रत्यक्षात मात्र,१० हजार रुपयांची उचल केली. घरपोच सेवा मिळाल्याने लाभार्थी महिलेचा विश्वास बसला.याच विश्वासाचा फायदा घेत,केंद्र चालक युवती प्रत्येक महिन्याला महिलेच्या घरी जात असे.कधी ‘सर्व्हर समस्या’ तर कधी ‘ठसा उमटत नाही’ असे खोटे सांगून ती एकाच दिवशी दोनदा ठसे घेऊन पैसे काढायची. अशाप्रकारे २०२४ पासून केंद्रचालक युवती महिलेच्या खात्यातून तब्बल १ लाख ८० हजार उडवले. आठवडाभरापूर्वी पिडीत महिलेच्या मुलाने बँकेत जाऊन पासबुकवर व्यवहाराची एन्ट्री केली.त्यात खात्यातून मोठ्या प्रमाणात पैशांची उचल झाल्याचे दिसल्यामुळे याबाबत त्याने आईला विचारणा केली असता फसवणुकीचा भंडाफोड झाला.फसवणुकीचा प्रकार लक्षात येताच लाभार्थी महिला तसेच कुटुंबीयांनी युवतीला पोलिसांच्या ताब्यात दिले.पोलिसांनी केंद्रचालक युवतीला ताब्यात घेतल्यानंतर तिने लगेच गुन्हा कबूल केला.इतकेच नाही,तर तिने पैसे परत करण्याची तयारी दर्शवत तक्रार न करण्याची विनंती केली.त्यामुळे पिडीत कुटुंबाने देखील तक्रार नोंदविली नाही.
- Advertisement -

