उद्रेक न्युज वृत्त
चामोर्शी :- तालुक्यातील कुनघाडा रै,तळोधी,मोकासा व नवेगाव रै येथील पाणी पुरवठा योजनेचा विद्युत पुरवठा महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने खंडित केल्यामुळे २ फेब्रुवारी पासून तर आजतागायत पाणीपुरवठा बंद असल्याने सर्वसामान्य नागरिकांचा विचार न करता विद्युत पुरवठा करणारी यंत्रणा नागरिकांच्या जीवावर उठली की काय? असा सवाल नागरिकांतून उपस्थित केला जातो आहे.
गावातील बंद पाणी पुरवठ्यअभावी नागरिकांना पाण्यासाठी कोसो दूरवर पायपीट करावी लागत आहे. बंद पाणीपुरवठा योजना तत्काळ पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी कुनघाडा रै येथील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली असूनही अजूनपर्यंत पाणी पुरवठा सुरू करण्यात आला नाही; याचे नवल वाटत आहे.
पाणीपुरवठा नळ योजना बंद असल्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांची २ फेब्रुवारी २०२३ रोजी शिष्टमंडळाने प्रत्यक्ष भेट घेऊन नळ योजना सुरू करण्याबाबत सविस्तर चर्चा केली होती.तसेच ८ फेब्रुवारी २०२३ रोजी जिल्हाधिकारी संजय मीणा व प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी भुयार यांना देखील निवेदन देण्यात आले आहे. मात्र अद्यापही पाणीपुरवठा सुरू करण्यात आला नसल्याने गावातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.अजून किती दिवस नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागणार आहे; याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत.