कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा तालुक्याच्या अरततोंडी गट ग्रामपंचायत तर्फे घेण्यात आलेल्या शिपाई पदाच्या परीक्षेत मोठा गोचा गोंधळ झाल्याचा आरोप परीक्षार्थी उमेदवारांनी केला आहे.विशेष म्हणजे,जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत तरबेज असूनही त्यांना परीक्षेत कमी गुण मिळाले; तर ग्रामपंचायतीत रोजंदारीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला जास्त गुण मिळाल्याने पेपरफुटी झाल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.त्यामुळे, शिपाई पदाचा पेपर व परीक्षा पुनश्च घेण्याची मागणी ग्रामसेवक,सरपंच यांच्यामार्फत गटविकास अधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठविलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
शिपाई पदासाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,गट ग्रामपंचायत अरततोंडी येथील शिपाई या पदाकरीता परीक्षा घेण्यात आली होती. पण,शिपाई पदाच्या पेपरची परीक्षा होण्याअगोदरच पेपरफुटी झाली.जे विद्यार्थी दोन ते पाच वर्षे एमपीएससी,सरळसेवा,पोलीस भरतीची तयारी करतात, अश्या उमेदवारांना कमी गुण मिळाले व त्याच ग्रामपंचायत मधील कर्मचारीला १०० पैकी ९१ गुण मिळाले.हे कसे शक्य आहे? त्यामुळे सदर परीक्षेत घोळ झाल्याचा आरोप करीत आपल्या कार्यक्षेत्रात नव्याने पेपर काढून परीक्षा घेत त्याच दिवशी निकाल जाहीर करावा,अशी मागणी ग्रामपंचायत अधिकारी यांच्याकडे सुमेध मेश्राम,विपीन मेश्राम,प्रणय ठवरे,मुकेश सुखदेवे,अमोल शेंडे,अनमोल सुखदेवे,विशाल फटिंग, रंजना तुलावी,मयूर डोंगरवार,भुमेश तुलावी,मिथुन ठलाल,शुभम नाकाडे,आशिष पंधरे आदींसह अन्यायग्रस्त उमेदवारांनी केली आहे.

