- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-शेतकरी बांधवांच्या सुख-दुःखात वर्षभर खांद्याला-खांदा लावून राबणाऱ्या सर्जा-राजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा बैलपोळा सण अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे.मात्र,यंदा पोळ्याच्या उत्साहावर महागाईचे सावट पसरले आहे.विशेष म्हणजे,
जीवनावश्यक वस्तूंसह शेतीसाठी लागणारी खते,बियाणे व इतर निविष्ठांच्या वाढलेल्या किंमतीमुळे शेतकरी बांधव आर्थिक अडचणीत आला आहे.त्यातच,पावसाने घेतलेल्या उघडीपमुळे दुष्काळाचे सावट निर्माण झाले असून खरीप पिकांची स्थितीही समाधानकारक नसल्याने बळीराजा चिंतेत आहे.त्यामुळे येत्या,गुरुवार १० सप्टेंबर २०२६ रोजी ग्रामीण भागात सर्वत्र साजरा करण्यात येणारा यंदाचा बैलपोळा साधेपणाने साजरा होण्याची शक्यता आहे.शेतात राबूनही अपेक्षित पाऊस न झाल्याने पिकांची वाढ समाधानकारक झालेली नाही.पिकांसाठी पुढील काळात जमिनीत ओलावा टिकून राहील की नाही?याची चिंता शेतकरी बांधवांना सतावत आहे. पाण्याच्या पातळीत अपेक्षित वाढ न झाल्याने आगामी काळात सिंचनाचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. दुष्काळी परिस्थिती असली तरी शेतकऱ्यांच्या भावविश्वातील बैलपोळ्याचे महत्त्व आजही कायम आहे.सर्जा-राजाला आंघोळ घालून,रंगरंगोटी करून, सजवून त्याची पूजा करण्याची परंपरा यंदाही उत्साहात पाळली जाणार आहे.मात्र,आर्थिक परिस्थितीचा विचार करून अनावश्यक खर्चाला फाटा देत परिस्थितीनुसार पोळा साजरा करण्याकडे शेतकरी बांधवांचा कल आहे.
पोळ्याच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत बैलांच्या सजावटीचे साहित्य दाखल झाले असले तरी वाढलेल्या किंमतीचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.घुंगरमाळा,कासरा,झुल, बाशिंग,मोरखी,पितळी तोडे आदी साहित्याच्या दरात गतवर्षीच्या तुलनेत वाढ झाली आहे.कासरे तयार करण्यासाठी लागणाऱ्या सुताच्या दरात यंदा वीस टक्क्यांनी वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.सर्जा-राजाच्या अन्य साज-सजावटीच्या साहित्याच्या किंमतीतही साधारण पंधरा ते २५ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.त्यामुळे पोळ्याचा खर्च वाढला असून आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांसमोर सर्जा-राजाला सजवायचे कसे?असा प्रश्न उभा राहिला आहे.दरवर्षी पोळ्याच्या काही दिवस आधी गजबजणारी बाजारपेठ यंदा तुलनेने शांत असल्याचे चित्र आहे.उत्पन्न घटण्याची भीती,वाढता शेतीचा खर्च आणि कर्जबाजारीपणा यामुळे सर्जा-राजाचा सण मोठ्या थाटामाटात साजरा करण्याऐवजी साधेपणाने करण्याकडे अनेक शेतकऱ्यांचा कल दिसून येतो आहे.
- Advertisement -

