उद्रेक न्युज वृत्त
संपादक/सत्यवान रामटेके
गडचिरोली :- ‘ मुला पेक्षा मुलगी बरी प्रकाश देतोय दोन्ही घरी’..! असे म्हटले जात असेल तरीही आजच्या घडीला मुलगा हा वंशाचा दिवा आहे असा गैरसमज समाजात आजही आहे.मुलीला दुय्यम स्थान देण्याची गोष्ट केली जाते.मुलगा-मुलगी दोघे समान ही धारणा समाजात रुजू होणे आवश्यक आहे.ही मानसिकता ठेवणाऱ्यांवर कायद्याचा वचक असतोच.मात्र मुलींची संख्या कमी असल्याने मुलांना लग्नासाठी मुली मिळत नसल्याचे दिसते.तसेच ज्या मुली आहेत त्यांच्या अपेक्षाही मोठ्या आहेत.शासकीय नोकरदार, उद्योजक अशीच मागणी असल्याने सामान्य आणि बेरोजगार असलेल्या मुलांना लग्नासाठी मुली मिळेना झाले आहे.मुलांची दिवसेंदिवस वय वाढतच चालली आहे. अशातच मुलींच्या अपेक्षेत वाढ झाली आहे.
सुशिक्षित बेरोजगारांची संख्या शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातही वाढत चालली आहे.ग्रामीण भागातील मुलीही आता शासकीय नोकरी वाल्यांना पसंती देत आहेत.काही भागात तर सुशिक्षित मुले वय होवूनही अविवाहीत आहेत.शासकीय नोकरी नसल्याने अनेकांचा पत्ताच कट केला जातो आहे.शेती असून शेतकऱ्यांच्या मुलांना मुली मिळणे कठीण झाले आहे.
मुलीचीच नव्हे तर वधूपित्याची पहिली पसंती शासकीय नोकरीतील मुलांनाच अधिक आहे.त्या खालोखाल खाजगी नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्या मुलांना अधिक पसंती दिली जाते.मात्र शेतकरी आणि ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार तरूणांना मात्र मुलगी मिळणे आधुनिक युगात कठीण झाले आहे.काही तरूण बिना हुंड्याने विवाह करायला तयार आहेत.परंतू वधूपिता मुलगी द्यायला तयार नाही.पूर्वीच्या काळात हुंडा व मुलगी अनेकांना मिळत होती.परंतू आधुनिक काळात त्यात बदल झाला आहे. त्यामुळेच वधूपिता आपली मुलगी सुखाने राहावी, यासाठी शासकीय नोकरीवर असलेला जावई शोधत आहेत.गावागावातच आता वरासाठी वधू शोधन्याचे काम सुरू आहे.परंतू जो-तो वधूपिता शासकीय नोकरी असणाऱ्यांनाच प्राधान्य देत आहे. शेतकऱ्याच्या मुलाचा भाव लग्नाच्या बाजारात घसरलेला आहे.चार ते दहा एकर शेती असणाऱ्या शेतकऱ्याच्या मुलाला मुलगी मिळणे कठीण जात आहे.एव्हढेच नव्हे तर मामा सुद्धा शेतकरी असलेल्या भाच्याला मुलगी देणे नापसंत करीत आहेत.त्यामुळे लग्नाळू मुलांना मुली मिळणे कठीण जात आहे.त्यामुळे वंशाचा दिवाच हवा ही मानसिकता बदलण्याची गरज आहे.अन्यथा लग्नासाठी ‘कुणी मुली देता कां? मुली’….असे झाल्याशिवाय राहणार नाही.