उद्रेक न्युज वृत्त
नागपूर:- एका महिला प्रवाशाचा चालत्या रेल्वेत बसतांना खाली पडून मृत्यू झाल्यामुळे मध्य रेल्वेने पीडित वारसदारांना भरपाई देण्यास नकार दिला होता.रेल्वे कायद्यानुसार ही दुर्दैवी घटना नाही.प्रवाशाने स्वतःहून अपघात करून घेतला.त्यामुळे रेल्वे भरपाई देण्यास जबाबदार नाही;असा दावा न्यायालयात करण्यात आला होता.न्यायालयाने हे मुद्दे बेकायदेशीर ठरविले.प्रवाशाने स्वतःहून अपघात करून घेतला हे मान्य करण्यासाठी प्रवाशाचा तसा उद्देश होता; हे आधी सिद्ध करणे आवश्यक आहे.प्रकरणातील प्रवाशाने आत्महत्या केली.असे रेल्वेचे म्हणणे नाही.
त्यामुळे अशा प्रकरणांत रेल्वेची काहिही चूक नसली तरी मृताच्या वारसदारांना भरपाई देणे बंधनकारक के आहे,असे न्यायालयाने सांगितले. दीपलक्ष्मी बांधे (50) असे मृत प्रवाशाचे नाव होते.त्या नागपूर येथील रहिवाशी होत्या. न्यायालयाने त्यांच्या वारसदारांना ८ लाख रुपये भरपाई मंजुर केली आहे.
रेल्वे तिकिटाचा मुद्दाही खारीज
प्रवासी महिलेकडे रेल्वेचे तिकीट नव्हते.त्यामुळे तिचे वारसदार भरपाईसाठी अपात्र आहेत, असा मुद्दा देखील रेल्वेने उपस्थित केला होता.न्यायालयाने तो मुद्दाही खारीज केला.केवळ रेल्वे तिकीट मिळाले नाही म्हणून प्रवासी तिकिटाशिवाय रेल्वे प्रवास करीत होती, असे म्हणता येणार नाही.अपघातानंतर तिकीट हरवले जाऊ शकते,याकडे न्यायालयाने लक्ष वेधले.
17 वर्षांपूर्वी वर्धा रेल्वे स्थानकावर घडली घटना
ही घटना 17 वर्षांपूर्वी वर्धा रेल्वे स्थानक येथे घडली. प्रवासी महिलेला 12 फेब्रुवारी 2006 रोजी अमरावती-नागपूर पॅसेंजरने वर्धा येथून नागपूरला यायचे होते. त्या फलाटावर पोहोचण्यापूर्वीच रेल्वे चालायला लागली. त्यामुळे त्या पुलावरून धावत येऊन रेल्वेत बसताना खाली कोसळल्या व रेल्वेखाली आल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.
कायद्यात दुर्दैवी घटनेची व्याख्या
रेल्वे कायद्यातील कलम १२३ (सी) मध्ये दुर्दैवी घटनेची व्याख्या देण्यात आली आहे.त्यानुसार, प्रवासी रेल्वेत, रेल्वे प्रतीक्षा कक्षात, आरक्षण व बुकिंग कार्यालयात.फलाटावर किंवा इतर रेल्वे परिसरात दहशतवादी घातपात घडणे. हिसक हल्ला घडणे, दरोडा पडणे, दंगल, गोळीबार, जाळपोळ होणे किंवा रेल्वेतून प्रवासी खाली पडणे या घटना दुर्दैवी घटना आहेत.