उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :- मोबाईलच्या वेडात आठवीच्या विद्यार्थ्याने जीव गमावला असून,अग्रनय सचिन बारापात्रे असे त्याचे नाव आहे. यूट्यूबवरील स्कार्फ फेस कव्हर चॅलेंजमुळे या मुलाचा जीव गेल्याचे बोलले जाते.
गच्चीवरील शिडीला गळफास घेतलेल्या अवस्थेत अग्रनयचा मृतदेह आढळून आला. लाठी-काठी चालवण्यात राष्ट्रीय पातळीवर तो तरबेज खेळाडू होता.ही घटना २५ जानेवारी रोजी सायंकाळी घडली. मृत्यूचे कारण आता पुढे आले आहे.
सतत मोबाईलवरील यूट्यूबचे व्हिडीओ बघण्याची सवय त्याला होती.स्कार्फ फेस कव्हर चॅलेंजमध्ये पूर्ण चेहऱ्याला स्कार्फ बांधून एखादी कृती करायचे आव्हान स्वीकारायचे प्रयत्न केले जातात. हेच आव्हान त्याला महागात पडल्याचे आता बोलले जाते. गच्चीवर खेळण्यासाठी गेलेला अग्रनय बराच वेळ परत न आल्याने पालक गच्चीवर गेले असता शिडीला ओढणीने गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला. काही तरी अंदाज या गेममध्ये चुकला असावा,असाही तर्क पोलिस लावत आहेत.