- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गोंदिया :-जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील गट ग्रामपंचायत फुटाणा अंतर्गत येणाऱ्या हळदी गावात दगडालाही पाझर फुटेल अशी हृदयस्पर्शी घटना घडली आहे.पंधरा दिवसांपूर्वीच पत्नीचे निधन झाले आणि परत २३ वर्षीय मुलाचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याने वडिलांवर दुःखाचे डोंगर कोसळले.घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.प्रमोद मारुती भोयर वय २३ वर्षे,रा.हळदी, ता.देवरी,जि.गोंदिया असे सर्प दंशाने मृत पावलेल्या तरुणाचे नाव असून त्याच्या आईचे निधन झाल्याने तो पुण्याहून मरणाला आला होता.
घटनेच्या दिवशी प्रमोद खाटेवर झोपला होता.शुक्रवारच्या मध्यरात्री झोपेत असतांनाच त्याला दांड्या काळीच्या सापाने दंश केला.दंश करताच तो खळबळून जागा झाला आणि काहीतरी चावल्याचा त्याला भास झाल्याने कुटुंबीयांना झोपेतून उठवले. खाटेवर पाहताच साप आढळून आल्याने प्रमोदचे वडील व ग्रामस्थांनी मिळून सापाला मारले.त्यानंतर घरच्यांनी प्रमोदला गावातच गावठी औषध दिली. त्यानंतर त्याला काही वेळानंतर बरे वाटले.परंतु, पहाटेला त्याची प्रकृती खालावल्याने त्याला देवरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच प्रमोदने अखेरचा श्वास घेतला.कित्येक सर्पमित्र साप चावताच क्षणाचाही विलंब न लावता सर्वप्रथम रुग्णालयात उपचार घेण्याबाबत सांगत असतात.मात्र, आजही अनेकजण गावठी औषध उपचार घेतांना दिसून येतात व जीव धोक्यात घालतात.महत्वाचे म्हणजे, मोजकेच तीन ते चार प्रजातींचे साप हे अतीविषारी म्हणून ओळखले जातात.उर्वरित कमी विषारी वा बिनविषारी असल्याने गावठी औषधाने बरे झाले,अशी मनधारणा झाली आहे.त्यामुळे याकडे दुर्लक्ष करू नये,असे सर्प मित्रांचे सांगणे आहे.
- Advertisement -

