- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला ‘पुष्पा: द राईज’ हा लोकप्रिय चित्रपट सर्वांच्याच लक्षात आहे.आंध्र प्रदेशच्या शेषाचलम जंगलातील लाल चंदनाच्या अवैध तस्करीवर आधारित असलेल्या चित्रपटात पुष्पाराज नामक भूमिकेत असलेला अल्लू अर्जुन एक साधा मजूर आपल्या कुशल बुद्धिमत्तेच्या आणि धडाडीच्या बळावर तस्करी सिंडिकेटचा सर्वोच्च प्रमुख कसा बनतो व शून्यापासून सुरुवात करून राजासारखा रुबाब निर्माण करणाऱ्या पुष्पाराजचा एक अनोखा अंदाज चित्रपटात दाखविण्यात आला आहे.काही चित्रपट हे खरोखरच सर्वसामान्य जीवन जगण्याच्या प्रत्यक्ष घडामोडींशी निगडित असतात की काय?नाहीतर त्यांचे काही जणांकडून अनुकरण करण्यात येतेय? याबाबत संभ्रम आहे.मात्र,चित्रपटात पुष्पाने ज्या प्रमाणे लाल चंदनाच्या अवैध तस्करीची जशी शक्कल लढवली होती; तश्याच प्रकारची सागवान लाकूड तस्करीसाठीची शक्कल अज्ञात तस्करांनी गडचिरोली जिल्ह्याच्या सिरोंचा तालुक्यातील असरअल्ली वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या परिसरात प्रत्यक्षात आजमावली आहे.प्रकरणी सागवान लाकडाच्या तस्करीचा डाव वनविभागाच्या पथकाने उधळून लावला व सव्वा दोन लाखांचे तब्बल २७ सागवान नग लाकूड जप्त केले.
- पुष्पा स्टाईलने सागवान लाकूड तस्करी👇
गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्याच्या असरअल्ली वनपरिक्षेत्रांतर्गत महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील इंद्रावती नदीपात्रातून सागवान लाकडाची तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती असरअल्लीचे वनपरिक्षेत्र अधिकारी(आरएफओ)शिवाजी पानगे यांना शुक्रवारच्या रात्री मिळाली असता वन विभागाच्या पथकाने तात्काळ महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर सापळा रचला.तस्करांना पळून जाण्याची संधी मिळू नये,यासाठी पथकाने नदीच्या दोन्ही बाजूंनी घेराबंदी केली.बराचवेळ पाळत ठेवल्यानंतर मध्यरात्री नदीपात्रात हालचाल जाणवली. विशेष म्हणजे,तस्करांनी नदीपात्रात सागवान लाकडाचे तराफे तयार करून सोडलेले होते व नदीपात्रातील पाण्याच्या प्रवाहाचा फायदा घेत काही अंतरावरून ती काढून विक्री करण्याचा त्यांचा डाव होता.मात्र,हालचाल जाणवताच वनपथकाने कारवाई सुरू केली.कारवाईची भनक लागताच तस्करांनी पळापळी सुरू केली आणि रात्रीचा अंधार व नदीच्या वेगवान प्रवाहाचा फायदा घेत पळ काढून निसटले.मात्र, तस्करांनी नदीपात्रात सोडलेले तब्बल २७ सागवान लाकूड वनपथकाने ताब्यात घेतले.महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील इंद्रावती नदीपात्रातून सिनेस्टाईल पद्धतीने सागवान तस्करी करणारी टोळी सक्रिय असून यापूर्वी देखील या ठिकाणी वनविभागाने कारवाया केल्या आहेत.
- Advertisement -

