उद्रेक न्युज वृत्त :- सध्याच्या घडीला मेकप करण्याचा व सुंदर दिसून सौंदर्य खुलविण्याचा सगळीकडेच कल वाढलेला दिसून येतो.अशातच लग्न म्हटले तर आणखी त्यात भर पडून सगळ्यांपेक्षा खुलून व टवटवीत दिसावे यासाठी मेकपचा आधार घेतांना कित्येकजण दिसून येतात.विशेषता मुलींना त्यांच्या लग्नात सुंदर दिसण्याची मोठी हौस असते.अशीच हौस नव वधूला महागात पडली आहे.
कर्नाटकातील एका तरुणीला मेकअप केल्यामुळे थेट रुग्णालय गाठावे लागले आहे.मेकअप केल्यानंतर मुलीचा चेहरा इतका बिघडला की तिला अतिदक्षता विभागात (ICU) दाखल करावे लागले आहे.इतकेच नाही तर यामुळे तिचे लग्नही पुढे ढकलण्यात आले. सदर प्रकरण समोर येताच तरुणीचा मेकअप करणाऱ्या ब्युटीशियनला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.विशेष बाब म्हणजे ज्या ब्युटी पार्लरमधून पीडित तरुणीने मेकअप करुन घेतला ते हर्बल ब्युटी पार्लर असल्याचीही माहिती समोर आली आहे.
मेकअपमुळे चेहरा खराब झालेली मुलगी जजूर गावची रहिवासी आहे.पीडितेचे लग्न ठरले होते. लग्नाच्या १० दिवस आधी तिने गंगाश्री हर्बल ब्युटी पार्लर आणि स्पा सेंटरमध्ये मेकअप करून घेतला. मेकअप केल्यानंतर पीडितेचा चेहरा सुजला होता. चेहऱ्यावरील तेजही गेले होते.ज्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले.हा मेकअप करताना तिला नव्या पद्धतीचा मेकअप करत असल्याचे संबंधित ब्यूटीशियनकडून सांगण्यात आले. मात्र नवरीला हा मेकअप चांगलाच महागात पडला आहे.