उद्रेक न्युज वृत्त
कोंढाळा :-देसाईगंज तालुक्यातील ग्रामपंचायतींनी दलित वस्ती सुधार योजनेचा निधी इतरत्र खर्ची न घालता दलित वस्त्यांच्या विकासासाठी निधीचा योग्य प्रकारे वापर करून विकास कामे करावी.असे कोंढाळा येथील बौद्ध समाजाचे अध्यक्ष शिशुपाल वालदे यांनी ग्रामपंचायतींना ठणकावून सांगितले आहे.
दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत ग्रामपंचायतींना जिल्हा परिषद मार्फतीने दरवर्षी लाखो रुपयांचा निधी दलित वस्ती विकास कामासाठी दिला जातो.सदर योजने अंतर्गत दलित वस्त्यांमध्ये अंतर्गत रस्ते,नाली बांधणे,पाणीपुरवठा,पाण्याचा हौद,समाजमंदिर, रस्त्यावरील विद्युत पुरवठा,सार्वजनिक शौचालये व इतर गरजा विचारात घेऊन विकास कामांकरिता निधीचा पुरवठा केला जातो.मात्र सध्याची परिस्थिती लक्षात घेता देसाईगंज तालुक्यातील काही ग्रामपंचायती दलित वस्ती सुधार योजनेचा निधी दलित वस्त्यांच्या विकास कामावर खर्ची न घालता इतर कामांवर व इतरत्र निधी खर्च करीत असल्याचे दिसून येत आहे.गावकऱ्यांना कोणत्याकामासाठी किती निधी आला व सदर निधी कशासाठी वापरले जाणार आहे याची माहितीच नसते व ग्रामपंचायत पदाधिकारीही माहिती देत नसल्याने सामान्य नागरिकांची गळचेपी होत आहे असे शिशुपाल वालदे यांनी म्हटले.दलित वस्ती सुधार योजनेचा निधी इतरत्र वापर केले गेले असल्यास माहितीच्या अधिकारात देसाईगंज तालुक्यातील ग्रामपंचायतींची माहिती घेऊ व संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करू असेही वालदे यांनी सांगितले.