उद्रेक न्युज वृत्त
कोंढाळा :- देशाचा नाही तर जगाचा पोशिंदा म्हटले जाणाऱ्या शेतकरी बांधवांची अवस्था बिकट स्वरूपाची झाली आहे.शेती मध्ये पाहिजे तेवढे उत्पन्न होतांना दिसून येत नाही.लागत खर्च जास्त तर उत्पादन कमी अशी अवस्था शेतकरी बांधवांची झाली असल्याने सध्याच्या काळात महागाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत.दिवसेंदिवस महागाईचा वणवा वाढत चालला आहे.यामधे शेतकरी होरपळत आहे.डिझेलची,पेट्रोलची दरवाढ सातत्याने होत आहे.दोन वर्षांत रासायनिक खतांचे भाव गगनाला भिडले आहेत.किटकनाशक औषधीचे दर वाढत चालले आहेत.शेतीत उत्पादन मात्र जेवढे आहे तेवढेच आहे.मात्र याचा आर्थिक फटका शेतकरी कुटुंबांना बसत आहे.पूवीच्या काळात शेतीला मोठे महत्व होते.एका शेतकऱ्याजवळ २० ते ५० एकर शेती असायची त्यावर कुटुंबाचा गाडा शेतकरी ओढत असायचा.
शेतकरी कुटुंबात आता नातेवाईकांची संख्या वाढत चालली आहे.शिवाय शेतीचे चार पट ते पाच पट तुकडे पडत आहेत.शेतकऱ्याच्या लोकसंख्येच्या मानाने निव्वळ शेतीवरच कुटुंबाचा खर्च चालविणे आता अवघड जात आहे.त्यामुळे शेतीचा व्यवसाय शेतकऱ्यांना न परवडणारा झाला आहे.काही शेतकऱ्यांची मुले उच्च शिक्षण घेऊन शहरात उच्च पदावर विराजमान झाले आहेत.मात्र काही कुटुंबे अजूनही शेतीवरच अवलंबून असल्याचे वास्तव चित्र नजरेसमोर प्रत्यक्ष दिसून येत आहे.
शेतीला जोडधंदा करुनही पाळीव जनावरांवरही रोगराईचे संकट येत आहे.उत्पादन कमी मात्र उत्पादन खर्च जास्त वाढत आहे.शेती व्यवसायासोबत पशुपालनाचा व्यवसायही तोट्यात येत आहे. दिवसेंदिवस महागाई गगनाला भिडत आहे. पूर्वीसारखे पशुधनही शेतकऱ्याजवळ नसल्याने शेतकऱ्यांना आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे अवघड जात आहे.शेतीचे उत्पादन मात्र जेवढे आहे तेवढेच असून शेतमालालाही पाहिजे तसा भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा कल आता दुसऱ्या व्यवसायाकडे वाढलेला दिसून येतो.मात्र शेतकरी बांधवांची अवस्था ‘जैसे थे’ पहावयास मिळत असल्याने शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण अधिक दिसून येतात.सततची नापिकी,अस्मानी संकट,किडीचा प्रादुर्भाव अशा विळख्यात शेत्या सापडल्याने काय करावे?असा प्रश्न शेतकरी बांधवांपुढे उभा येऊन ठाकला आहे.