उद्रेक न्युज वृत्त
कुरखेडा :- मागील काही दिवसांपासून जंगली हत्तींचे आरमोरी तालुक्यातील जंगल परिसरालगत संचार सुरु आहे.सद्यस्थितीत या हत्तींचा संचार वैरागड, पाठणवाडा परिसरात सुरु आहे.गुरुवारी पाठणवाडा शेतशिवारात धुडगूस घातल्यानंतर काल मध्यरात्रीच्या सुमारास हत्तींच्या कळपाने वैरागड- चामोर्शी मार्गावरील शेतशिवारात हैदोस घालित धान पिक नेस्तनाबूत केले.मागील दोन दिवसात वैरागडसह पाठणवाडा या शेतशिवारातील जवळपास ६२ शेतक-यांच्या शेकडो हेक्टर क्षेत्रातील धान पीक भूईसपाट झाल्याने हातचा घास हिरावल्या गेल्याची खंत नुकसानग्रस्त शेतकरी व्यक्त करीत आहेत.गुरुवारी रात्रीच्या सुमारास हत्तींनी वैरागड पाठणवाडा येथे धान पिकांची प्रचंड नासाडी केली होती.यात जवळपास ४२ शेतक-यांच्या शेतपिकांचे नुकसान झाले होते. शेतपिकात हैदोस घातल्यानंतर हत्ती परत जंगलाकडे प्रयाण केले.दरम्यान काल मध्यरात्रीच्या सुमारास पुन्हा वैरागड- चामोर्शी मार्गावरील वैरागड येथील शेतशिवारात या हत्तींनी धुडगूस घालित धान पीक नेस्तनाबूत केल्याची माहिती आहे.धानपीक सध्या स्थितीत कापणीच्या मार्गावर आहेत तर काहींचे पीक बहरत आहे.अशास्थितीत मागील काही दिवसांपासून या परिसरात रानटी हत्तींचा मुक्त संचार कायम असल्याने शेतकरी चांगलेच धास्तावले आहेत.सदर. घटनेची माहिती प्राप्त होताच हुल्ला पथकासह वन विभागाच्या पथकाने काल शुक्रवारी सकाळच्या सुमारास घटनास्थळ गाठित मौका पंचनामा केला. वनरक्षक भारत शेंडे व इतर वन कर्मचाऱ्यांनी नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करीत शेतकऱ्यांची चौकशी केली.तात्काळ नुकसानीचा अहवाल वरिष्ठ स्तरावर पाठवून आर्थिक मदत देण्याचे आश्वासन वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाश मेश्राम यांनी दिली आहे.