उद्रेक न्युज वृत्त
सिरोंचा (गडचिरोली) :- गडचिरोली जिल्ह्याच्या सिरोंचा तालुक्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे.चोरटे दुसरीकडे डल्ला न मारता चक्क लहान मुलांच्या अंगणवडीतील साहित्यावर हात साफ करून चोरटे पसार होऊ लागले आहेत.चोरट्यांनी एकाच आठवड्यात सिरोंचा तालुक्यातील सहा अंगणवडीतील साहित्य लंपास केल्याची घटना उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून सिरोंचा तालुक्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.इंद्रावती तसेच गोदावरी व प्राणहिता नदीवर पुलाची निर्मिती झाल्यापासून तेलंगाणा तसेच छत्तीसगड राज्यातील चोरटे सिरोंचा तालुक्यात चोरी करून आपल्या राज्यात पसार होत आहेत.अशातच चोरट्यांनी एका आठवड्यात सिरोंचा तालुक्यातील चिंतरवेला येथील अंगणवाडीतून २ गॅस सिलींडर,भांडे लंपास केले.याच अंगणवाडीतून ९ जून रोजी सोलर बॅटरी व इतर वस्तू लंपास केल्या.अंकिसा अंगणवाडी केंद्रातून सोमवारी दि.१७ जून रोजी गॅस सिलींडर,गॅस शेगडी,आहार शिजविण्याचे भांडे व इतर वस्तू लंपास केल्या.वडधम येथील अंगणवाडीतून १२ जून रोजी एलईडी टीव्ही,गॅस शेगडी,कुकर,सोलर ईन्व्हर्टर,सोलर पॅनल व अन्य साहित्य लंपास केले. मंगळवारी दि.१८ तुमनूर माल अंगणवाडी केंद्रातून एलईडी टीव्ही,बॅटरी,गॅस शेगडी,सिलींडर,पंखा,७ पॉकेट खाद्य तेल लंपास केले.याच दिवशी तुमनूर चेक अंगणवाडी केंद्रातून एलईडी टीव्ही,सोलर,ईन्व्हर्टर, सोलर बॅटरी,सिलींग फॅन व अन्य साहित्य लंपास केले. यासंदर्भात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

