उद्रेक न्युज वृत्त
पुणे :- घराबाहेर जाताना कुलूप लावून सवयीप्रमाणे दाराबाहेर लपवून ठेवलेल्या चावीचा वापर करूनच चोरट्यांनी घरातील ९७ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना नारायण पेठेत घडली. ही घटना भर दिवसा दुपारी बारा ते एक वाजताच्या सुमारास घडल्याने परिसरात भर दिवसा झालेल्या चोरीची सर्वत्र चर्चा होत आहे.
नारायण पेठेत मोदी गणपती मंदिराजवळ वैष्णवी अपार्टमेंटमध्ये चार फेब्रुवारीला भरदिवसा चोरी करून ९७ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरण्यात आला. सदर प्रकरणी एका महिलेने दिलेल्या तक्रारीवरून विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला वैष्णवी अपार्टमेंट येथे राहतात.त्या चार फेब्रुवारीला घराच्या दरवाजाला कुलूप लावून कामासाठी बाहेर गेल्या होत्या.त्या वेळी जाताना त्यांनी घराबाहेरील गादीखाली चावी ठेवली होती. अज्ञात चोरट्यांनी गादीखाली ठेवलेली त्यांची चावी घेऊन घराचा दरवाजा उघडला.त्यानंतर घरात प्रवेश करून लोखंडी कपाट आणि कपाटातील ड्रॉवर तोडून त्यातील ३५ हजार रुपयांची रोकड, ६२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि पाचशे रुपये किमतीचे चांदीचे तोडे, असा ऐवज चोरून नेला.