उद्रेक न्युज वृत्त
औरंगाबाद : – जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्या अंतर्गत येणाऱ्या आमठान गावातील ग्रामपंचायतीने घेतलेल्या अनोख्या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.लग्नात नववधूसाठी ग्रामपंचायतीच्या तर्फे एक पैठणी देण्यात येणार आहे.शिवाय जावयाचा देखील ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात येणार आहे.मुलींच्या साठी अनेक योजना येत्या काळात गावात राबविण्यात येणार असल्याचा मानस ग्रामपंचायतीच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला आहे.
आमठान ग्रामपंचायतीने घेतलेला ठरावाची सध्या जोरदार चर्चा आहे.चर्चा ही व्हायला हवी; असा गावातील मुलींच्या आपुलकीचा विषय म्हणजे माहेरची साडी.ग्रामीण भागातील प्रत्येक नववधूच्या नशिबात पैठणी साडी नसते.त्यामुळेच आमठान या ग्रामपंचायतीने गावातील सर्व नववधूंना लग्नात अहिर म्हणून पैठणी साडी देण्याचा ठराव परित करण्यात आला आहे.तर नवरदेवाचे शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात येणार आहे.ग्रामपंचायतीच्या दहा टक्के उत्पन्नातून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
१६ फेब्रुवारी रोजी आमठान येथे पंढरीनाथ मोहनाजी सोमासे यांची कन्या उज्वला व आकाश यांचा विवाह पार पडला.सोहळ्यामध्ये आमठाणा ग्रामपंचायतीच्या सरपंचा कोकीळाबाई मोरे,उपसरपंचा विमलबाई लोखंडे,ग्रामपंचायतीच्या सदस्या सोनूताई खरात, कमलबाई कदम,सिंधुबाई,रुखमनबाई मोरे,देवशाला तायडे,सीमा जाधव यांच्या हस्ते नववधूस माहेरची साडी म्हणून पैठणीचा अहेर करण्यात आला.असा अनोखा उपक्रम राबविणारे महाराष्ट्रातील पहिलीच ग्रामपंचायत असावी अशी सर्वत्र चर्चा आहे.