उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-पोलिसच गुन्हेगारांना हाताशी धरून वसुली करीत असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. बजाजनगर ठाण्याच्या काही कर्मचाऱ्यांनी गुन्हेगारांनाच आपला वसुली एजंट नियुक्त केले आहे. पोलिसांच्या या दलालांनी संपूर्ण आयटी पार्क परिसरात दहशत पसरवून ठेवली आहे.ते स्वतःसोबतच पोलिसांसाठीही वसुली करीत आहेत. बोरकर नावाच्या या गुन्हेगाराचा मोठा भाऊ आधी पोलिसांसाठी वसुलीचे काम करीत होता.आता तो अवैध सावकारी करून लोकांची पिळवणूक करत आहे आणि वसलीचे काम लहान भावाकडे दिले आहे. दुकानदारांनुसार,संपूर्ण आयटी पार्क परिसरात बोरकर बंधुंची दहशत आहे.व्हीएनआयटी आणि आयटी पार्क परिसरात खाद्य पदार्थांचे ७० ते ८० ठेले लागतात. व्हीएनआयटीचा परिसर बजाजनगर आणि आयटी पार्कचा परिसर प्रतापनगर ठाण्यांतर्गत येतो. तुकडोजीनगर परिसरात बोरकर बंधुंचे घर आहे. बोरकर बंधूंची टोळी खाद्य पदार्थांचा ठेला लावणाऱ्यांना धमकावतात.प्रत्येक दुकानदाराकडून महिन्याचे तीन ते साडेतीन हजार रुपये खंडणी वसुलतात.रस्त्याच्या दोन्ही बाजूला लागणाऱ्या दुकानातून वसुली केली जाते.जे पैसे देत नाही त्यांना दुकान लावू दिले जात नाही.दोन्ही ठाण्याच्या काही कर्मचाऱ्यांनी स्वतःसाठी वसुली करण्याचे काम बोरकर बंधूंना दिले आहे.दुकानदारांचे म्हणणे आहे की,गुन्हेगार आणि पोलिसांचे आपसात संगणमत असल्यामुळे तक्रारही करता येऊ शकत नाही.जर कोणी तक्रार करण्याचा प्रयत्न केला तर त्याची माहिती त्यांना मिळते आणि ते धमकावण्यासाठी येतात.दोन्ही भावांची परिसरात इतकी दहशत आहे की,दुकानदार व नागरिक वरिष्ठांकडेही त्यांची तक्रार करण्याचे धाडस करत नाही.