- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-जिल्हा मुख्यालयापासून अवघ्या ५ किलोमिटर अंतरावर असलेल्या नवेगाव येथे रविवार १३ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्हा परिषदेतील एका सेवानिवृत्त महिला अधिकारीची डोक्यावर लोखंडी रॉडने प्रहार करून हत्या केल्याची घटना दुपारच्या सुमारास उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.कल्पना केशव उंदिरवाडे वय ६३ वर्षे रा.नवेगाव असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे.
कल्पना उंदिरवाडे या आपल्या मुलासोबत नवेगाव येथील सुयोगनगर येथे राहत होत्या.त्यांच्यासोबत घरकाम करणाऱ्या शांताबाई अंबादास मुळे वय ६०,रा.नवेगाव यासुद्धा राहत होत्या.उंदिरवाडे यांचे राहते घर दुमजली असून,खाली व वरच्या मजल्यावर तीन कौटुंबिक खोल्या आहेत. सर्वात वरच्या मजल्यावर तीन सिंगल रूम असून, त्याठिकाणी शिक्षण घेणाऱ्या मुली राहत आहेत.सर्वच खोल्या किरायाने दिल्या आहेत.
माहितीनुसार,घरकाम करणाऱ्या शांताबाई ह्या बाहेर गावी गेल्या होत्या.त्यातच रविवारी दुपारच्या सुमारास त्या परत आल्या व कल्पना उंदिरवाडे यांचे घरी दुपारी २ च्या सुमारास गेली असता,घराचे दार खुले होते. त्यातच घरातील टीव्हीही सुरु होता.अशातच कल्पना उंदिरवाडे ह्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत दिसून आल्याने काम करणाऱ्या शांताबाईने आरडा-ओरड करून शेजारच्यांना माहिती दिली.घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच याबाबत गडचिरोली पोलिसांना पाचारण करण्यात आले.पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.कल्पना उंदिरवाडे यांच्या शरीरावर लोखंडी रॉडने मारहाण केल्याच्या जखमा होत्या.पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविला.घटनेच्या पुढील तपास पोलिस अधीक्षक नीलोत्पल,उपविभागीय पोलिस अधिकारी सूरज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली ठाण्याचे पोलिस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण फेगडे करीत आहेत.
- Advertisement -