उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या खामला येथील ऑरेंज सिटी चौकातील जनसंपर्क कार्यालयात परत एकदा धमकीचे फोन आल्यामुळे खळबळ माजली आहे. या धमकीमुळे पोलिसांनी कार्यालय आणि त्यांच्या निवासस्थानी सुरक्षा व्यवस्था वाढवून फोन करणाऱ्याचा तपास सुरु केला आहे. दोन महिन्यात दुसऱ्यांदा गडकरींच्या कार्यालयात धमकीचा फोन आल्यामुळे सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सकाळी अकरा वाजताच्या सुमारास धमकीचा पहिला कॉल आला. कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी या घटनेनंतर तातडीने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी जनसंपर्क कार्यालय गाठत माहिती घेतली. दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज सी-20 चा समारोप आहे.गडकरी यांच्या उपस्थितीत आयोजित होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये सुरक्षाविषयक विशेष काळजी घेतली जात आहे.एटीएसच्या पथकानेही कार्यालयाला भेट देऊन माहिती घेतली.
आज सकाळी दोनदा गडकरी यांच्या ऑरेंज सिटी रुग्णालयाच्या समोरील जनसंपर्क कार्यालयात धमकीचे कॉल आले.धक्कादायक म्हणजे पुन्हा एकदा जयेश पुजारी उर्फ जयेश कांथा या गुन्हेगाराच्या नावाने धमकीचे कॉल आले आहेत.त्यानंतर नितीन गडकरी यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी नागपूर पोलिसांना पुन्हा एकदा धमकीचे कॉल आल्याची माहिती दिली आहे.