उद्रेक न्युज वृत्त
मुख्य संपादक/सत्यवान रामटेके
देसाईगंज(गडचिरोली) :- देसाईगंज तालुक्यातील कुरूड येथील प्रतीक विजय घोडेस्वार याच्या हत्या प्रकरणातील आरोपी विकास जनार्दन बोरकर वय ५० वर्षे रा.कुरुड याला देसाईगंज पोलिसांनी मोठ्या शिताफिने अटक केली.अटक केल्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता; न्यायालयाने त्याला ११ मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
कुरूड येथे ९ फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास प्रतीक घोडेस्वार याच्या डोक्यावर प्रहार केल्याने त्याचा मृत्यू झाला.सदर घटनेची माहिती देसाईगंज पोलिसांना मिळताच; अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.हत्या केल्यानंतर अज्ञात आरोपीने कोणताही पुरावा मागे न ठेवल्याने आरोपीचा शोध घेणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता; कुरखेडाचे उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र भोसले यांनी देसाईगंजचे पोलिस निरीक्षक अजय जगताप यांच्या नियंत्रणाखाली तपास पथक नेमले.पथकाने प्रकरणाचा कसून तपास करीत संशयित आरोपी विकास बोरकर याला ताब्यात घेतले.चौकशीदरम्यान सुरुवातीला त्याने उडवाउडवीचे उत्तर दिले.मात्र पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली.त्यानंतर त्याला बुधवारी अटक करण्यात आली. न्यायालयाने आरोपीला ११ मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

