- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-पेट्रोल संपल्याने बंद पडलेल्या कारला रोडलगत घेण्यासाठी धक्का मारत असतांना मागून वेगात आलेल्या ट्रकने आधी कारला व नंतर शेजारी उभ्या असलेल्या महिलेला जोरात धडक दिली.या धडकेमुळे महिला पुलावर खाली फेकली गेली. त्यामुळे तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर कारचालक गंभीर जखमी झाला.ही घटना हिंगणा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अमरावती-नागपूर महामार्गावरील धामणा येथील उड्डाण पुलावर मंगळवारच्या मध्यरात्री १.२० वाजताच्या सुमारास घडली.
सुषमा ललित ठक्कर वय ५० वर्षे,रा.मोतीनगर, अमरावती असे मृत महिलेचे तर अजय अंबादास दंडारे वय ५२ वर्षे,रा.विद्युतनगर,अमरावती असे गंभीर जखमी कारचालकाचे नाव आहे.ठक्कर कुटुंबीय कामानिमित्त त्यांच्या एमएच-०५/बीएस-५३९० क्रमांकाच्या कारने अमरावतीहून नागपूरला जात होते. धामणा (ता.नागपूर ग्रामीण) येथील उड्डाण पुलावर पेट्रोल संपल्याने कार रोडवर बंद पडली.त्यामुळे कारमधील सर्वजण खाली उतरले.सुषमा व त्यांची मुलगी सानिया ललित ठक्कर वय २० वर्षे या दोघी पुलाच्या कठड्याजवळ उभ्या होत्या तर पती ललित मगन ठक्कर वय ५२ वर्षे व मुलगा श्लोक ललित ठक्कर वय १८ वर्षे हे दोघे कार रोडलगत घेण्यासाठी मागून ढकलत होते.
दरम्यान,अमरावतीहून नागपूरच्या दिशेने वेगात जात असलेल्या एमएच-१२/व्हीटी-८२२२ क्रमांकाच्या ट्रकने आधी कारला मागून जोरात धडक दिली आणि नंतर सुषमा यांना उडविले.या धडकेमुळे त्या पुलावरून खाली सर्व्हिस रोडवर फेकल्या गेल्याने गंभीर जखमी होऊन त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.शिवाय,कारचालक अजय दंडारे आत फसल्याने त्याला गंभीर दुखापत झाली.सुषमा यांचे पती,मुलगी व मुलगा हे तिघेही थोडक्यात बचावले.
माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.त्यांनी जखमी अजयला उपचारार्थ रविनगर,नागपूर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये भरती केले तर सुषमा यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नागपुरातील शासकीय रुग्णालयात पाठविला. याप्रकरणी हिंगणा पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याच्यासह ट्रक ताब्यात घेतला.घटनेचा पुढील तपास नेपाल जांबुळकर व जयश्री तिरले करीत आहेत.
- Advertisement -