उद्रेक न्युज वृत्त
आकाश धाकडे
गडचिरोली :-जिल्ह्यातील कमलापूर हत्तीकॅम्पमधील मंगला हत्तीणीच्या प्रसूतीनंतर तिच्या पिलाचा मृत्यू झाला असल्याची घटना उघडकीस आली आहे.गरोदर मंगला हत्तीण काही दिवसांपासून जंगलात गेली होती.त्यामुळे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी हत्तीकॅम्प परिसरालगतच्या जंगलात शोध घेतला असता तिचे पिल्लू मृतावस्थेत आढळून आले आहे.गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा वनविभागाच्या अंतर्गत येत असलेल्या कमलापूर येथील वनपरिक्षेत्रातील शासकीय हत्ती कॅम्पमध्ये एकूण आठ हत्ती आहेत.येथील मंगला हत्तीण मागील काही महिन्यांपासून गरोदर होती.रविवारी तिची जंगलात प्रसूती झाल्याचे लक्षात येताच तिला आणण्यासाठी कर्मचारी जंगलात गेले.मात्र,त्यांना हत्तीणीचे पिल्लू मृतावस्थेत आढळून आले.घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.सिरोंचा वनविभागा अंतर्गत येत असलेल्या कमलापूर वनपरिक्षेत्रातील शासकीय हत्तीकॅम्प हे राज्यातच नव्हे तर देशात प्रसिद्ध आहे. दरवर्षी या ठिकाणी पर्यटकांची वर्दळ असते.मात्र, दुर्लक्षामुळे दरवर्षी येथील हत्तींचा मृत्यू होतो आहे. यापूर्वी मंगलाच्या आदित्य,सई,अर्जुन नावाच्या तीन पिलांचा मृत्यू झाला आहे.त्यामुळे वन विभागाच्या कार्यप्रणालीवर पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली आहे.