उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :- एकाच क्रमांकाच्या अनेक गाड्या शहरात फिरत असल्याची बाब उघडकीस आली आहे.एका व्यक्तीने नियम मोडल्यानंतर दुसऱ्याच व्यक्तीला दंड भरण्यासाठी ई-चालान आल्याने ही बाब उघड झाली आहे.चालान मिळालेले अनिल पवार यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार करून त्यांच्या वाहनाच्या क्रमांकाचा वापर करून गुन्हे करण्यात वापर होण्याची व फसले जाण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे.
हुडकेश्वर येथील ढग्याच्या बंगल्याजवळ राहणारे अनिल पवार यांच्या मोबाईलवर आलेले पोलिसांचे चालान पाहून धक्काच बसला.१४ फेब्रुवारीला कॉटन मार्केटमध्ये एमएच-४९,बीएफ ४६०९ क्रमाकांच्या वाहनचालकाने कुठला तरी नियम मोडल्याने ७५९ रुपये दंड भरण्यासाठीचा संदेश चालानासह त्यांच्या मोबाईलवर त्याच दिवशी प्राप्त झाला.
सोबत संबंधित वाहनाचा फोटोसुद्धा होता.गाडीचा क्रमांक पाहून तेही चक्रावले.त्या दिवशी ते कॉटन मार्केटला गेले नसताना हे चालान कसे? असा प्रश्न त्यांना पडला,पण गाडीचा क्रमांक सारखाच होता. त्यांनी निरखून पाहिले असता धक्कादायक बाब त्यांच्या लक्षात आली.नियम मोडणाऱ्या वाहनाचा क्रमांक सारखाच असला तरी गाडीची कंपनी आणि वाहनचालक व्यक्तीही वेगळीच होती.ही बाब पोलिसांच्या लक्षात आणून द्यावी म्हणून त्यांनीही पोलिसांकडे तक्रार नोंदविली.चित्रात दर्शविलेली मोपेड आणि त्यावर स्वार व्यक्ती त्यांच्या वाहनाचा क्रमांक वापरून गुन्हे करण्यासाठी वापर करीत असल्याची शक्यता व्यक्त करीत फसले जाण्याची भीती अनिल पवार यांनी व्यक्त केली.