उद्रेक न्युज वृत्त :- उन्हाळ्यात सुट्ट्यांमुळे सर्वत्र लग्नसराईची धूम असते.मात्र,यंदा मोजक्या लग्नमुहूर्तामुळे लग्न जमलेल्या उपवर- वधूंची चांगलीच गोची झाली आहे. यंदा एप्रिल महिन्यात मोठ्या प्रमाणात लगबगीने विवाह पार पडले.तर मे महिन्यात हिंदू पंचांगानुसार १ व २ मे या दोन दिवशी लग्न मुहूर्त होते.आता एकदम दोन महिन्यानंतर तिथी आहेत.त्यामुळे मुहूर्त व तिथीनुसार लग्नबेडीत अडकणाऱ्यांना वाट पाहण्यावाचून पर्याय नाही.
३ मे ते ३१ मे या संपूर्ण महिन्यामध्ये गुरू व शुक्र दोघांचा लोप असल्याने या कालावधीत विवाह तिथी नाही.तर १ जून ते ११ जूनदरम्यान गुरू व शुक्र लोप तर १२ जुन ते २८ जुन दरम्यान शुक्र लोप असल्याने शुभविवाह सोहळ्यास तिथी नाहीत.आपल्या नियोजनानुसार व सोयीनुसार मे व जून महिन्यात विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येते.तथापी दोन महिन्याच्या अवकाशानंतर एकदम जुलै महिन्यात विवाह मुहूर्त आहेत.परंतु, या कालावधीत दमदार पावसाला सुरूवात झालेली असते.यंदा पर्जन्यमान अधिक असल्याचा आधीच अंदाज वर्तविण्यात आला आहे.जुलै महिन्यात ९,११, १२,१३,१४,१५,१९,२१,२२, २३,२५, २६,२७,२८,३०, ३१ जुलै तर ऑगस्ट,सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये पावसाळा आणि चातुर्मासात विवाह सोहळ्यास तिथी नसल्याने दीपावली तुळशी विवाहानंतरच लग्नाचा बार उडणार आहे.
मे व जुन सलग दोन महिन्यांत शुभविवाह सोहळ्यास तिथी नसल्याने विवाहोच्छुक वर व वधूंना दोन महिने वाट बघावी लागणार आहे.तथापी काहींना पुरोहितांचा सल्ला घेऊन शुभ दिवसाचा उतारा यावर शोधला आहे.

