उद्रेक न्युज वृत्त
कुरखेडा(प्रतिनिधी) :- प्रत्यक्षात सती नदी मध्य पात्रातून उपसा होऊन सुद्धा जिल्हा खनिकर्म अधिकारी यांना पाठविलेल्या अहवालात अवैध उत्खनन झालेच नाही असा अभिप्राय नोंद करण्यात आला आहे.गुरनोली येथील तलाठी व तहसीलदार कुरखेडा यांनी बनावट अहवाल जिल्हा खनिकर्म अधिकारी यांना पाठविल्याचा आरोप नवरगाव येथील शेतकरी व या प्रकरणात तक्रारदार असलेले संजय कवाडकर यांनी केला आहे.सदर प्रकरणाची योग्य चौकशी करून येथील तहसीलदार व गुरनोली तलाठी यांच्यावर कारवाई करावी; अशी मागणी त्यांनी जिल्हा प्रशासनाला सादर केलेल्या निवेदनात केली आहे.
तहसीलदार कुरखेडा यांनी अहवाल सादर करतांना गुरनोली येथील तलाठ्याच्या पंचनाम्याचा उल्लेख केलेला आहे.त्या पंचनामांमध्ये साक्षीदार म्हणून ज्या दोन लोकांचे नाव आहेत.त्यामध्ये पितांबर उईके हा रा.नवरगाव आंधळी व जयंत दरवडे रा.वाघेडा हे दोघेही रेती घाटावर काम करणारे दिवाणजी असून त्यांना चौकशी पंचनामा तयार करतांना पंच ठेवणे हे संशयास्पद आहे.तलाठी गुरनोली यांनी मोघम एक पानाचा पंचनामा तयार केलेला आहे.तो बनावट आहे. सदर जागेचा भूमी अभिलेख कडून मोजणी न करता सरसकट सर्व गट क्रमांक टाकून येथे उत्खनन झालेच नाही.असा उल्लेख केलेला आहे.आम्ही दिलेल्या तक्रारीत नवरगाव आंधळी भागात उत्खनन झालेल्या तक्रारीत उल्लेख असतांना सुद्धा आंधळी येथील तलाठ्यांना या प्रकरणात एक ही अहवाल तहसीलदार कुरखेडा यांनी मागितलेला नाही.तलाठी आंधळी यांना सदर मोका चौकशी मध्ये सामील ही करून घेतलेले नाही.त्यामुळे सदर अहवाल बनावट व अवैध रेती उपसा करणाऱ्या लोकांना वाचवनिण्याच्या हेतूने तयार केलेला आहे.असा आरोप संजय कवाडकर यांनी केलेला आहे.
अरततोंडी येथील सर्वे क्रमांक १५१ मध्ये १७६५ ब्रास उत्खनन झाले असेल,तर या ठिकाणी तशी उत्खनन झाल्याची चिन्ह दिसणे अपेक्षित आहेत.परंतु प्रत्यक्षात मंजूर शेतीच्या जागेतून येथे उत्खनन झालेलेच नाही. मंजूर व सिमांकान करून दिलेल्या जागी उत्खनन न करता सती नदी मध्य पात्रातून मोठ्या प्रमाणात उपसा झालेला आहे.या संबंधी चित्रफीत व छायाचित्र उपलब्ध आहेत.उत्खनन झाले सती नदी पात्रात रापडी ट्रॅक्टर लावून सपाट करण्याचे प्रकार ह्या अवैध उपसा करणाऱ्यांकडून झाले आहेत.सर्व पुरावे खोटे ठरविण्याचा प्रयत्न अहवालाच्या माध्यमाने झाले आहे.
कुरखेडा तालुक्यात ३१/०१/२०२३ रोजी गठित झालेल्या पथकाने २०२१-२२ मध्ये ८ ट्रॅक्टर पकडले असा उल्लेख जिल्हाधिकारी कार्यालयात खणीकर्म अधिकारी यांना सादर केलेल्या अहवालात नमूद आहे. पथक गठित होण्याआधीच कार्यवाही करणे ही नवलाची बाब आहे.पथक गठित होण्याआधी कार्यवाही करून ट्रॅक्टर पकडत असेल तर यांना महसूल विभागाने विशेष सन्मान बहाल केला पाहिजे.
गठित पथकाने अजतागायगत वाळू उपसा भागात एकही स्थायी तपासणी नाके लावले नाही.१२ जानेवारी २०२३ रोजी वाळू उपसा परवानगी दिली होती आणि याची कल्पना येथील तहसीलदार यांना असून ही अर्जदाराने २९/०१/२०२३ रोजी तक्रार केल्या नंतर आपली बाजू सावरण्याचा हेतूने ३१ जानेवारी २०२३ रोजी कागदोपत्री पथक तयार करून अवैध उत्खनन वर कार्यवाही करिता दक्ष असल्याचा बनाव करण्याचा प्रकार समोर येत आहे.
अरततोंडी येथे शेतीतून उपसा न करता सती नदी पात्रातून उपसा झालेला आहे.या प्रकरणात येथील तहसीलदार व गुरनोली तलाठी यांची भूमिका संशयास्पद असून यांची वरिष्ठ स्तरावरून सखोल चौकशी व्हावी.अशी मागणी सर्व स्तरावरून जोर धरू लागली आहे.